विंजासन बुद्धलेणीला ऐतिहासिक वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:18 PM2018-04-29T23:18:57+5:302018-04-29T23:19:23+5:30

बौद्ध बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रावती तालुक्यातील विंजासन येथील बौद्धलेणी टेकडीचा परिसर १० एकर इतका आहे. यामध्ये टेकडी पाच एकर जमिनीवर वसली आहे.

The historic heritage of Vinjasan Buddhaleni | विंजासन बुद्धलेणीला ऐतिहासिक वारसा

विंजासन बुद्धलेणीला ऐतिहासिक वारसा

googlenewsNext
ठळक मुद्देअपेक्षा निरपेक्ष संशोधनाची : लेणीच्या सौंदर्यीकरणाची अनेकांना भूरळ

सचिन सरपटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : बौद्ध बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रावती तालुक्यातील विंजासन येथील बौद्धलेणी टेकडीचा परिसर १० एकर इतका आहे. यामध्ये टेकडी पाच एकर जमिनीवर वसली आहे. २५ हजार वर्षांपूर्वीची ही लेणी असून भिक्खू सागत नावाच्या स्थवीराच्या निमंत्रणावरून भगवान बुद्ध या ठिकाणी येऊन गेले व येथूनच ते अंबतिथ्यकला येथे गेल्याचे इतिहासकार सांगतात.
ही बुद्ध गुंफा दोन भागात खोदण्यात आली असून पहिल्या भागात सभागार व शून्यागार एवढेच कार्य कोरण्यात आले आहे. नंतर राजा हर्षवर्धनाच्या काळात बुद्ध मूर्ती कोरण्यात आली. भद्रावतीच्या दक्षिण - पश्चिम दिशेला विंजासनच्या टेकडीत बुद्धगहा आहे. या टेकडीत ७१ फुट अंतरावर लांब सज्जा काढलेला आहे. येथे एकूण तीन गुफा असून पहिल्या गुफेची लांबी ७४ फूट व रूंदी २० फूट असून यामध्ये बुद्धांची ध्यामुद्रेत कोरलेली मूर्ती ११ फुट तीन इंचाची असून रंग तांबूस आहे. दुसरी गुंफुा ४७ फुट लांब असून २० फूट रूंद आहे. यामध्ये सात फुट एक इंच आकाराची असलेली बुद्धांची मूर्ती आहे. तर तिसरी गुंफा ३५ फूट लांब असून मूर्ती ८ फूट चार इंच इतकी आहे.
पूर्वी या गुहेत विद्येचे आसन होते. यात बौद्ध भिक्खूंना विद्या दिली जाते. बौद्ध पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

विजासन बुद्धलेणीचे सौंदर्यीकरण
विंजासन बुद्धलेणी पसिराचे सौंदर्यीकरण भद्रावती नगरपरिषदेद्वारे प्रादेशिक पर्यटन निधी अंतर्गत घेण्यात आले असून या कामाला सुरूवात झाली आहे. १ कोटी ९९ लाखांचे हे काम आहे. हा परिसर भारतीय पुरातत्व विभागाकडे येत असून न.प.ने पुरातत्व विभागाकडून संबंधित काम करण्याची परवानगी घेतली आहे. त्या कामामध्ये पुरातत्व विभागाने काही बदलही सूचविले आहे. त्या बदलानुसारच न.प. या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम करीत असून येत्या ३ ते ४ महिन्यात सदर काम पूर्ण होईल. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वयंपाकगृह बांधण्यात आले आहे. बगिचाचे कामही सुरू होणार आहे. बुद्ध लेणीच्या खालील मैदान समांतर करण्यात आले असून परिसर पुरातन वाटावा, यादृष्टीने दगड लावण्यात येणार आहे. हायमॉक्स बाबतही शासनाकडून माहिती मागविण्यात आली आहे. बुद्धलेणीकडे जाणारा रस्ता हा कॉंक्रीटचा होता. परंतु पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार तो रस्ता डांबरी होणार आहे. किचनशेड व शौचालय परिसरातील संरक्षण भिंतीचे कामही न.प. द्वारे करण्यात आले आहे. सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने पुरातत्व विभागाकडून बुद्धलेणी परिसराच्या समोरील भागाला लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. सोबतच विंजासन बुद्धलेणी ट्रस्टच्या वतीने पर्यटकांसाठी थंडपाण्याच्या दृष्टीने वॉटर कुलर लावण्यात आले आहे. भिक्खू निवासस्थानाचे कामही होणार आहे. जनतेने यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.
वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व
सोमवारी वैशाख पौर्णिमा. तथागतांच्या जीवनात या वैशाख पौर्णिमेला विशेष महत्व आहे. या पौर्णिमेलाच तथागतांच्या आयुष्यातील पाच महत्त्वाच्या घटनांची नोंद इतिहासात आढळून येते. राजपूत्र सिद्धार्थ गौतमाचा जन्म, युवराज्ञी यशोधरेचा जन्म, राजकुमार सिद्धार्थचा विवाह, ज्ञान प्राप्ती व महापरिनिर्वाण याच त्या पाच घटना आहेत.

Web Title: The historic heritage of Vinjasan Buddhaleni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.