ऐतिहासिक वारसा इतिहासाचा आत्मा
By admin | Published: September 26, 2016 01:14 AM2016-09-26T01:14:31+5:302016-09-26T01:14:31+5:30
चंद्रपूर जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक स्मारके आहेत.
अशोकसिंह ठाकूर : इतिहास विभागाचा उपक्रम
गडचांदूर : चंद्रपूर जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक स्मारके आहेत. या स्मारकांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे जतन करण्याची जबाबदारी युवकांची आहे. स्थानिक इतिहासावर संशोधन होण्यासाठी हा ऐतिहासिक वारसा महत्त्वपूर्ण आहे. म्हणून ऐतिहासिक वारसा इतिहासाचा आत्मा आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक अशोकसिंह ठाकूर यांनी केले.
शरदराव पवार महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित एक दिवसीय चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. चर्चासत्राचा विषय ‘इतिहास संशोधनात स्थानिक इतिहासाचे योगदान’ हा होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून तुळशिराम पुंजेकर, नोगराज मंगरूळकर, प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह, राजेश सिंह आदी उपस्थित होते.
संशोधक अशोकसिंह ठाकूर पुढे म्हणाले की, इतिहासात संशोधन करण्यासाठी या विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड असली पाहिजे, जिज्ञासा असली पाहिजे. याप्रसंगी त्यांनी पी.पी.टी. च्या माध्यमातून जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारकांची ओळख करून देऊन माहिती दिली. जिल्ह्यातील भटाळा, चंदनखेडा, माणिकगड किल्ला या भागातील ऐतिहासिक वास्तुंची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. संजय गोरे यांनी केला. महाविद्यालयाच्या वतीने अशोकसिंह ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. तर अशोकसिंह ठाकूर यांनी महाविद्यालयाला इतिहासाचे ग्रंथ भेट दिले. प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. शरद बेलोरकर यांनी केले. संचालन निकिता गोहणे यांनी तर आभार दीक्षा आगलावे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी, प्रा. डॉ. सुनिल बिडवाईक, प्रा. डॉ. माया मसराम, प्रा. डॉ. जतेंदर सिंह, प्रा. मंगेश करंबे, अशोक नामेवार, सुरेश चांदेकर, सुभाष टेकाम, शशीकांत ढोकणे, प्रफुल गेडाम, विशाल चांदेकर, हरिश्चंद्र पोटे, योगेश महाकुलकर, कपील गोहणे, योगेश चौधरी, आचल आगलावे, नीलेश चौथाले आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)