चिमुरातील ऐतिहासिक क्रांती पुलाला तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:01 AM2019-07-27T01:01:03+5:302019-07-27T01:04:34+5:30
चिमूर-वरोरा मार्गावर असलेल्या क्रांती पुलाला तडे गेल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या पुलाकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष देवून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. भारतात चिमूर क्रांती प्रसिद्ध आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर-वरोरा मार्गावर असलेल्या क्रांती पुलाला तडे गेल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या पुलाकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष देवून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
भारतात चिमूर क्रांती प्रसिद्ध आहे. ज्या लोखंडी पुलावर भारतीयांच्या रक्ताचा सडा पडला आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांना सळो की, पळो करून सोडले, अशा रक्तरंजित पुलाला तडे गेले आहे. दगडाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा पूल खचण्याच्या मार्गावर आहे. मात्र, याकडे पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
ऐतिहासिक पुलाचे जतन होणे गरजेचे आहे. क्रांतीकारकांच्या शौर्याची साक्ष देणारा हा लोखंडी पूल आहे. या पुलाला पाहून कित्येक नागरिकांचे ब्रिटीशांविरुद्ध रक्त सळसळते आणि शुरांची प्रेरणा आपल्याला मिळते. याच पुलाकडे पाहून क्रांतीकारकाच्या बलीदानाची आठवण येते. पुरातन प्रेमी ऐतिहासिक पुलाला दरवर्षी स्वच्छ करून क्रांतीकारकांच्या बलिदानाला उजाळा देतात. नुकतेच येथील पुरातन प्रेमी कवडू लोहकरे यांनी पुलाची पाहणी केली असता या पुलाला भेगा गेल्याचे आढळून आले. त्यामुळे हा ऐतिहासिक पूल खचण्याची भिती आहे. पुलाला धोका निर्माण होऊन अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पुलाची डागडुजी करण्याची मागणी पुरातन प्रेमी कवडू लोहकरे यांनी प्रशसनाकडे केली. यावेळी निखिल भालेराव, ऋषीकेश बाहुरे, संदीप किटे, आशिष ईखारे, क्रिष्णा मसराम, समीर बंडे, पंकज बंडे, मोहन सातपैसे, गोपाल मासूरकर आदी उपस्थित होते.