बृहदाश्मयुगीन दफनभूमी उलगडणार इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:30 AM2018-06-08T00:30:29+5:302018-06-08T00:30:39+5:30

नागभीड तालुक्यापासून १५ किमी अंतरावर पश्चिमेकडील कोरंबी येथे लोहयुगीन, महापाषाणयुग, बृहदाश्मयुग, मेगॉलिथिक काळातील २४ शिलास्तंभ (मिनहिर) चंद्रपुरातील युवा अभ्यासक अमित भगत यांनी नुकतेच शोधून काढले.

History of the colossal cemetery | बृहदाश्मयुगीन दफनभूमी उलगडणार इतिहास

बृहदाश्मयुगीन दफनभूमी उलगडणार इतिहास

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील शिलास्तंभांचीही वाढली संख्या : उत्खननासाठी पुरातत्त्व विभागाच्या हालचाली सुरू

राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागभीड तालुक्यापासून १५ किमी अंतरावर पश्चिमेकडील कोरंबी येथे लोहयुगीन, महापाषाणयुग, बृहदाश्मयुग, मेगॉलिथिक काळातील २४ शिलास्तंभ (मिनहिर) चंद्रपुरातील युवा अभ्यासक अमित भगत यांनी नुकतेच शोधून काढले. हे शिलास्तंभ इ.स.पूर्व १५०० ते इ.स.पूर्व २०० दरम्यानातील असावीत, असा अंदाज असून भगत यांनी एक वर्षाच्या कालखंडात जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक शिलास्तंभांचा शोध घेतला. ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक डॉ. रा. र. बोरकर, डॉ. कांती पवार व अशोकसिंह ठाकूर यांनीही १५ शिलास्तंभ शोधली होती. मात्र, भगत यांच्या शोधकार्याने शिलास्तंभांची संख्या वाढली असून पुरातत्त्व विभागाने काही प्राचीन स्थळांच्या उत्खननाची तयार सुरू केली आहे.
अमित भगत यांनी यापूर्वी नागभीड शहराजवळील डोंगरगाव परिसरात ४८ शिलास्तंभ शोधले होते. डोंगरगाव परिसरात काळ्या व लाल रंगाची अभ्रकयुक्त खापरे तसेच लोहभट्टीचे अवशेष मिळाले आहेत. इतिहासपूर्व वसाहतीचा हा सबळ पुरावा असल्याचे पुरातत्त्व अभ्यासक्षेत्रात मानले जात आहे. डोंगरगावातील महापाषाणयुगीन दफनभूमीच्या नैऋत्य दिशेला १.५ किमी अंतरावर एक दफनभूमी आढळली. तेथे एकूण ११ शिलास्तंभ सापडले आहेत. त्यातील एक मोठा शिलास्तंभ ३.६५ मीटर उंच तर १.७५ मीटर रुंद आहे. शिलास्तंभाच्या या भव्य आकारामुळे स्थानिक नागरिकांकडून राकस गोटा अथवा ‘राक्षस गोटा’ असा उल्लेख केला जातो. याठिकाणी हत्यारेही मिळाली. जिल्ह्यातील हा सर्वात मोठा शिलास्तंभ असून महाराष्ट्रातील ज्ञात शिलास्तंभापैकी सर्वात भव्य शिलास्तंभ असावा, असा दावा भगत यांनी केला आहे. महापाषाण युगाच्या अवशेष स्वरूपातील या ३ दफनभूमीव्यक्तिरिक्त नागभीड, ब्रम्हपूरी व चिमुर तालुक्यात ३४ शिलास्तंभ आढळले. त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यात शोधलेल्या शिलास्तंभांची संख्या १०० पेक्षा अधिक झाली आहे. यापूर्वी डॉ. र. रा. बोरकर यांनी नागभीड येथे ९, देऊळवाडा येथे १, डॉ. कांती पवार यांनी हिरापूर येथे ३ आणि अशोकसिंह ठाकूर यांनी विलम येथे २ असे एकूण १५ शिलास्तंभ शोधले होते. कोरंबी येथील या बृहदाश्मयुगीन दफनभूमीजवळच प्राचीन मानवी वसाहतीच्या अवशेषांचा रिठ आहे. पृथ्वीवरील आदीमानवापासून विकासाचे असंख्य टप्पे कसे तयार झाले़ मानवाचा उत्तरोत्तर कसा विकास होत गेला, याचा शोध घेण्यासाठी वसाहतींच्या अवशेषांना मोठे महत्त्व आहे़ शोधकार्यातून जिल्ह्यातील शिलास्तंभांची संख्या वाढत असल्याने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने अनभिज्ञ राहू नये, असे अभ्यासकांचे मत आहे़
आढळली लघुपाषाण हत्यारे
कोरंबी येथे मानवी वसाहतीचा सबळपुरावा म्हणून लघु पाषाणाची हत्यारे (मायक्रोलिथिक टुल्स) काळ्या, तांबड्या, करड्या रंगांची अभ्रकयुक्त खापरे व प्राचीन लोहभट्टीचे अवशेष आढळली आहेत. सोबतच मॅग्नेटाईट या लोहखनिजाचे अवजड चुंबकीय खडक सुद्धा सापडले. गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३५-४० वर्षांपूर्वी या दफनभूमीनजीक कच्च्या रस्त्याचे काम चालू असताना काही दफने खोदण्यात आली होती. त्याठिकाणी मातीची भांडी व लोखंडाची गंजलेली हत्यारे सापडली होती. त्यामध्ये लोखंडी छिन्न्या, भाले, चपट्या, कट्यारी, कढ्या व नखण्यांचा समावेश होता. त्यामुळे ही लोहयुगीन काळातील दफनभूमी असण्याला भक्कम पुरावा मिळतो. यादिशेने अधिक संशोधनाची गरज असल्याचेही भगत यांनी नमूद केले आहे.
-तर नवी ऐतिहासिक तथ्ये पुढे येतील !
नागरगोटा, पांडुबारा व नवतळा येथील डोंगराच्या गुहेत गुहाचित्र मिळाली आहेत. ही चित्रे जगभरातच प्रसिद्ध आहेत. या परिसरातही लघु पाषाणाची हत्यारे (मायक्रोलिथिक टुल्स) काळ्या, तांबड्या, करड्या रंगांची अभ्रकयुक्त खापरे व प्राचीन लोहभट्टीचे अवशेष आढळले आहेत. त्यामुळे माणूस हा गुहेतून जमिनीवर आल्याचा पुरावा या परिसरात मिळतो. मानवी जीवनाच्या विकासक्रमातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पश्चिम विदर्भात आढलेल्या शिल्पस्तंभांची संख्या अतिशय अल्प आहे. मात्र, पूर्व विदर्भात विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यात शिलास्तंभांची संख्या सर्वाधिक असल्याने त्यावर मूलभूत संशोधन करण्याची गरज आहे. कोरंबी हा वनपरिसर घोडाझरी अभयारण्यामुळे नागरिकांच्या प्रवेशाला प्रतिबंधित करण्यात आला. त्याच परिसरात बृहदाश्मयुगीन दफनभूमी व लघु पाषाणाची हत्यारे आढळली. त्यामुळे या महापाषाणयुग ऐतिहासिक वारसा टिकवून त्यावर अभ्यास केला तरच पुरातत्त्व विभागाच्या हाती नवी तथ्ये येवू शकतील, असे मत अमित भगत यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले़
वन विभागाने दिली परवानगी
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने त्यांच्या संशोधनाची दखल घेतली असून घटनास्थळाचे उत्खनन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या शोध मोहिमेदरम्यान अभ्यासक भगत यांना नागभीड येथील 'झेप निसर्गमित्र' या पर्यावरणवादी संघटनेचे सदस्य अमित देशमुख, समीर भोयर यांनी सहकार्य केले. कोरंबी हा परिसर घोडाझरी अभयारण्य प्रकल्पाअंतर्गत येत असल्याने ब्रह्मपूरी वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांच्या परवानगीनंतरच भगत यांनी हे शोधकार्य केले.
पुरातत्त्व चमूंनी केली पाहणी
जिल्ह्यातील समृद्ध वनसंपदा आणि ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटकांची संख्या वाढली़ परंतु, लोहयुगापासून मानवी अस्तित्वाचे सबळ पुरावे शोध कार्यातून पुढे येत आहेत़ त्यामुळे मागील महिन्यात पुरातत्त्व विभागाच्या उच्चस्तरीय चमुने विविध ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली़ यासंदर्भात एक अहवालही तयार करण्यात आला आहे़
 

Web Title: History of the colossal cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.