शिस्तबद्ध मूक मोर्चाने घडविला इतिहास

By admin | Published: October 20, 2016 12:44 AM2016-10-20T00:44:30+5:302016-10-20T00:44:30+5:30

कोपर्डी येथील बलात्कार व हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करा, ..

History created by the disciplined silent march | शिस्तबद्ध मूक मोर्चाने घडविला इतिहास

शिस्तबद्ध मूक मोर्चाने घडविला इतिहास

Next

ऐक्य आणि नियोजनाचे दर्शन : चंद्रपुरात दिवसभर मोर्चाचीच चर्चा
चंद्रपूर : कोपर्डी येथील बलात्कार व हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करा, स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करा यासह एकूण २१ मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा कुणबी क्रांती मुक मोर्चा बुधवारी चंद्रपुरात धडकला. हजारोंच्या संख्येत समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. म्हाडा कॉलनीपासून चांदा क्लब ग्राऊंडपर्यंत नऊ किलोमीटरचे अंतर कापून चालत आलेला हा मोर्चा बघण्यासाठी नागरिकांचीही गर्दी उसळली होती. महाराष्ट्रभर निघालेल्या मुक मोर्चाची शिस्त चंद्रपुरातही अबाधित असल्याचे दिसून आले.
मुक मोर्चाच्या आयोजनासाठी मागील एक महिन्यापासून चंद्रपुरात हालचाली आणि नियोजन सुरू होते. अखेर आज बुधवारी निघालेला मोर्चाच्या यशस्वीतेने आयोजकांच्या परिश्रमाची फलश्रृती झाली.
मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहतील, हे लक्षात घेऊन शहराबाहेर म्हाडा कॉलनीतील मोकळ्या मैदानावरून या मोार्चाला सुरूवात झाली. सकाळपासूनच मोर्चेकरी विविध वाहनांनी म्हाडा कॉलनी परिसरात गोळा होण्यास सुरूवात झाली. मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा-कुणबी बांधवांसाठी पुरेशी व नियोजनबद्ध बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
उपस्थितांना माईकवरून सातत्याने श्स्तिीचे पालन करण्यासाठी व गोंधळ टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात येत होत्या. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दुपारी १२.१५ वाजता मोर्चा म्हाडा कॉलनीतून निघाला. अग्रभागी शाळकरी विद्यार्थीनी, त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला, शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, समाजातील पुरुष मंडळी, डॉक्टर, वकील व नेतेमंडळी असा क्रम ठरविण्यात आला होता.
मराठा कुणबी क्रांती मुक मोर्चा सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास येथील चांदा क्लब ग्राऊंडवर पोहचला. त्यावेळी मोर्चात सहभागी युवतींनी मंचावरून मनोगत व्यक्त केले. शिवरायाच्या काळात स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांचे हात कलम केले जायचे. आता त्याच शिवरायाच्या भूमीत बलत्कारी मोकळे कसे ? देशाचे पोट भरणारा शेतकरी याच भूमीत भुकेला कसा, मराठा हा बहुजन समाजाचा घटक असतानाही तो आरक्षणाच्या बाहेर कसा, अशा विविध प्रश्नांची सरबत्तीच मोर्चेकरी युवतींनी आपल्या मनोगतातून शासनाला केली.
दुपारी निघालेला मोर्चा २.३० वाजताच्या सुमारास जटपुरा गेटजवळ पोहचला. त्यानंतर जयंत टॉकीज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, गांधी चौक, गिरणार चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक येथून निघून येथील चांदा क्लब ग्राऊंडवर समारोपासाठी एकवटला. एकाच वेळी सर्व मोर्चेकरी या पटांगणात एकत्रित आल्याने मोर्चाचे व्यापक स्वरुप दृष्टीपथास येत होते. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने मोर्चेकरी चांदा क्लबच्या दरवाजातून आत येत होते. या ठिकाणी सर्व मोर्चेकरी एकत्रित आल्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. हा मोर्चा नेतृत्वहिन असल्यामुळे कुणाही नेत्यांचे चांदा क्लब ग्राऊंडवर भाषण झाले नाही. मात्र या दरम्यान, मोर्चात सहभागी काही तरुणींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रणाली कृपल म्हणाली, कोपर्डीतील घटना अत्यंत घृणास्पद व लांच्छनास्पद आहे. त्यामुळे या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करते. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असला तरी अशा घटना आजही आपल्या भूमीत घडत आहेत. शिवरायांच्या काळात स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांचे हात कलम केले जात होते. मात्र त्याच भूमीत आता बलत्कारी मोकळे फिरताहेत, हे दुर्दैवाची बाब आहे. अ‍ॅट्रासिटी कायद्याचा दुरूपयोग होत आहे, हे खरे आहे. त्यामुळे कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात सुधारणा केली पाहिजे. मराठा हा बहुजन समाजाचाच घटक आहे. त्यामुळे त्यालाही आरक्षण मिळाले पाहिजे, असेही ती आपल्या मनोगतात म्हणाली. कोमल उदार म्हणाली, सध्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगच तारू शकतो. त्यामुळे शासनाने स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करणे आवश्यक आहे. यशस्वी कडवे म्हणाली, उद्योगांसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहे. मात्र आता उद्योगच बंद पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अवस्था तेल गेले अन् तूपही गेले, अशी झाली आहे. शिष्टमंडळ म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या पाचही मुली परत आल्यानंतर राष्ट्रगित गाऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे, नऊ किलोमीटरचा दीर्घ प्रवास करून चांदा क्लब ग्राऊंडवर जमा झालेल्या मोर्चेकऱ्यांचा उत्साह समारोपापर्यंत कायम होता. मोर्चादरम्यान स्वयंसेवक पाणीपाऊच, रस्यावरील कचरा मनपाने ठेवलेल्या कंटेनरमध्ये टाकत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

शिष्टमंडळात पाच मुली
जिजाऊ वंदनेनंतर मोर्चेकरांचे शिष्टमंडळ या नात्याने पाच मुलींना जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी पाठविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार या पाच निवडक मुलींची निवड करण्यात आली. यापैकी गौरी ठोंबरे हिने सर्वप्रथम व्यासपिठावर येऊन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला पाठविण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन केले. त्यानंतर पाचही मुली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाल्या.

जिल्ह्याबाहेरील ग्रामीणांचा सहभाग
मोर्चात चंद्रपूरसह यवतमाळ, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील ग्रामीणांचाही सहभाग दिसून आला तर काही मोर्चेकरी बाहेर जिल्ह्यातून रेल्वेनेही आले असल्याची चर्चा मोर्चादरम्यान होती.
शेतीची कामे ठेवली बंद
मोर्चात सहभागी व्हायचे असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आज शेतीची कामे बंद ठेवली. तर काहींनी आपली गुरे घरीच बांधून चंद्रपूरची वाट धरली. शेतीच्या कामाचा हंगाम असतानाही शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आज मोर्चात आवर्जुन हजेरी लावली होती.

बाजारपेठेत शुकशुकाट
लाखोंचा फटका
बुधवारी सकल मराठा-कुणबी समाजाच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. मोर्चासाठी पोलीस विभागाने शहरातील मुख्य रस्ते वाहनविरहित घोषित केले होते. दिवसभर एकाही वाहनाला जाऊ दिले जात नसल्याने शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. चंद्रपूरची बाजारपेठ ही प्रसिद्ध आहे. जिल्हाबाहेरील लोक खरेदीसाठी येतात. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांना लाखोंचा फटका सहन करावा लागला.

Web Title: History created by the disciplined silent march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.