दुर्लक्षित सार्वजनिक विहिरी झाल्या हायटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:58 PM2017-10-09T22:58:47+5:302017-10-09T22:59:07+5:30
शहरात असलेल्या ४० सार्वजनिक विहिरी जीर्ण अवस्थेत व दुर्लक्षित असल्याने त्याचा वापर भविष्यात होऊ शकतो.
राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : शहरात असलेल्या ४० सार्वजनिक विहिरी जीर्ण अवस्थेत व दुर्लक्षित असल्याने त्याचा वापर भविष्यात होऊ शकतो. ही बाब मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या लक्षात आल्यानंतर राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना माहिती देऊन पाणी टंचाईच्या वेळी त्याचा वापर होऊ शकतो, याची कल्पना विस्तृतपणे सांगितल्यानंतर सार्वजनिक विहिरीची दुरुस्ती करण्यात हिरवी झेंडी देण्यात आली. आणि काय आश्चर्य विहिरीतील उपसा करुन डागडजी केल्याने सदर दुर्लक्षित विहिरी हायटेक झाल्याचे दिसून येत आहे.
नेहमी दुर्लक्षित असलेल्या विहिरी आज पाण्याने व्याप्त असून टंचाईच्या वेळी त्याचा वापर होणार असल्याने पाण्याचे स्त्रोत वाढण्यास मदत झाली आहे.
नगर परिषद मूल अंतर्गत येणाºया विविध वॉर्डात ४० सार्वजनिक विहिरी आहेत. सदर विहिरी दुर्लक्षित असल्याने त्यातील पाण्याचा वापर तर सोडाच त्या विहिरीकडे ढुंकूनसुद्धा कुणी बघत नव्हते. घाणीच्या साम्राज्यात असलेल्या विहिरी दुर्लक्षितपणामुळे ओस पडल्या होत्या. या ठिकाणी एखाद्यावेळी अनुचित प्रकार घडण्याची भीतीही तेवढीच होती. नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सार्वजनिक विहिरीबाबत काय करता येईल, याबाबत इंटरनेटचा वापर करुन माहिती शोधली. विहिरीना मूर्त रुप देता येऊ शकते, ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर व पदाधिकारी, नगरसेवक यांच्या लक्षात आणून दिली. तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कक्षात राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक विहिरीबाबतची माहिती देण्यात आली. त्याला ना. मुनगंटीवार यांनी संमती देताच मुख्याधिकारी सरनाईक यांनी पाणी पुरवठा विभागाचे विनोद येनूरकर यांना कल्पना व सविस्तर माहिती देऊन कामाला सुरुवात करण्यात आली. प्रथमत: प्रायोगिक तत्वावर १० सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसण्यात आला. डागडुजी करुन विहिरीला अप्रतिम रंगविण्यात आले. त्यामुळे आजच्या स्थितीत विहिरी स्वच्छ व सुंदर दिसत आहेत. विहीरीतील पाण्याची पातळी तर वाढली त्याच बरोबरच दुर्लक्षित असलेल्या विहिरी सर्वांचे लक्ष वेधत असल्याचे दिसून येते. वरील विहिरीतील पाण्याचे नमुने वेध शाळेत नेऊन तपासणी केली जाणार आहे. पाणी वापरण्याजोगे करण्यासाठी काय करता येईल. याबाबत पाण्याच्या नमून्यातील निकाल आल्यानंतर कार्यवाही केली जाणार आहे. तूर्तास पाण्याची पातळी वाढली असल्याने व विहिरी सुशोभिते दिसत असल्याने सर्वाचे लक्ष वेधत असून सार्वजनिक कामासाठी पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. या विहिरींचा कायापालट करण्यासाठी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केलेला प्रयोग सर्वांना दिशा देणारा ठरणार आहे. भौतिक विकासाबरोबर शाश्वत विकास महत्वाचा असून तो चिरंतर टिकणारा आहे. छोट्या- छोट्या बाबीतून कल्पना सूचल्या तर त्याचा उपयोग जनसामान्यांना होऊ शकतो, हेच यावरुन दिसून येते.