मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षकांचे धरणे
By admin | Published: April 27, 2017 12:48 AM2017-04-27T00:48:08+5:302017-04-27T00:48:08+5:30
आपल्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले.
पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती : २ मेपासून तीव्र आंदोलन करणार
चंद्रपूर : आपल्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले. यावेळी अनेक शिक्षकांनी आंदोलनात सहभागी होऊन शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला. दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी संघटना प्रतिनिधींची भेट घेत आंदोलनातील सर्व समस्या तत्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रभारी शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय डोर्लीकर, उपशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण व शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषतंर्गत ७५२ प्राथमिक शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी प्रलंबित आहे. या व इतर समस्यांसाठी जिल्ह्यात शिक्षकांचे रोस्टर, अतिरिक्त शिक्षक समायोजन व विषय शिक्षक पदस्थापना, आंतरजिल्हा बदल्या भारमुक्त प्रकरणे या व अन्य प्रलंबित समस्यांविरोधात सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी ४६ डिग्री तापमानात ३०० पेक्षा जास्त शिक्षक-शिक्षकांची उपस्थिती होती. ऐन आंदोलनाच्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच दिवशी भारमुक्तच्या तयारीत होते. तर शिक्षणाधिकारी प्राथमिक आजारी रजेवर गेले. त्यामुळे उपशिक्षणाधिकारी यांनी मंडपात येऊन मागण्या समजून घेत तत्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले. यासाठी त्यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक (प्रभारी प्राथमिक) यांना बोलाविण्यात आले होते. रात्री ७ वाजता चर्चेला सुरूवात झाली. मात्र, प्रशासनाची अनेक मुद्यांवर नकारघंटा कायम होती.
मुख्याध्यापक, विषयक शिक्षक, रोस्टर आदी आंदोलनातील सर्वच मुद्दे मान्य केले. तर अवघड विषय शिक्षक आणि पदोन्नती या मुद्यांवर नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे यावेळी सांगण्यात आले.यामध्ये वरिष्ठ श्रेणी तात्काळ मार्गी लागणार, विषय शिक्षकमध्ये विज्ञान पदवीधरांना प्रथम प्राधान्य मिळणार, अवघड मध्ये सुटलेल्या गावाबाबत आक्षेप आल्यास त्याचा विचार केला जाईल.
जिवती तालुका संपूर्ण अवघड घोषित करावा ही मागणी संघटनेने रेटून धरली. यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बाजू मांडू असे आश्वासन मिळाले. जि.प. अध्यक्षांनी अवघड निवड प्रक्रियासाठी आधी व्यवस्थित निर्देश का दिले नाही, सर्व वेगवेगळे निकष का लावत आहे, याबाबत विचारणा केली, डीसीपीएस पावत्या तफावतबाबत लेखाधिकारी यांना कार्यवाही करण्यास सांगणार असून, विषय शिक्षक यादी दोन दिवसांत व कार्यवाही ५ मे पर्यंत करणार असल्याचे सांगण्यात आले. विषय शिक्षक झाल्याशिवाय समायोजन शक्य नाही, बदली वेळापत्रक सीईओंशी चर्चा करून लगेच जाहीर करणार. आंतरजिल्हा बदली भारमुक्त अंतिम टप्प्यात, तत्काळ भारमुक्त करण्यात येईल. अध्यक्षांनी स्वतंत्र पत्र दिले याबाबत, रोस्टर-ज्याचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, नियुक्ती नोंद, नियुक्ती आदेश नाहीच त्याचे प्रस्ताव मंत्रालयात पाठवणार, याच्यामुळेच पोस्टर अडले आहे. ब्रह्मपुरी, चिमूर व अन्य तालुक्यात संघटना प्रतिनिधींना अवघड निश्चितीसाठी बोलावले नाही त्याची तक्रार करण्यात आली. शिक्षकांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष करणाऱ्या तालुका प्रशासनाला कारवाईचे पत्र देणार, सर्व समस्यांबाबत समाधानकारक निकाल व कार्यवाही २९ एप्रिलपर्यंत करण्याचे भोंगळे यांनी प्रशासनाला निर्देश दिले. प्रशासनाने समस्या गांभीर्याने न घेतल्यास २ मे पासून संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा पुरोगामी संघटनेच्या वतीने देण्यात आला.
धरणे आंदोलनाचे आयोजन जिल्हाध्यक्ष विजय भोगेकर, सरचिटणीस हरिश ससनकर, महिला अध्यक्षा अल्का ठाकरे, सचिन शालिनी देशपांडे, राज्य उपाध्यक्ष चंदा खांडरे, विदर्भ अध्यक्ष राजेश दरेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी दीपक वऱ्हेकर, दिलीप इटनकर, रवी वरखेडे, अशोक दहेलकर, सुनिता इटनकर, अर्चना येरणे, प्रतिभा उदापुरे, दुष्यांत मत्ते, पुष्पांकर बांगरे, सुभाष अडवे, उरकुडे, भाऊराव कावळे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
कोरपन्यात अ. भा. प्राथमिक शिक्षकांचे धरणे
कन्हाळगाव : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन कोरपना येथे तहसील कार्यायासमोर मंगळवारला पार पडले. यावेळी जुनी पेंशन योजना तत्काळ लागू करावी, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन सातवा वेतन १ जानेवारी २०१६ पासून लागू करावा, शिक्षक व शिक्षण विषयक समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण आयोगाची स्थापना करावी, आदी मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या. नायब तहसीलदार अविनाश देवकर यांना शिक्षकांतर्फे निवेदनही देण्यात आले. यामध्ये चंद्रकांत पांडे, कैलाश म्हस्के, नानाजी फरकाडे, घनश्याम पाचभाई, राजेश मेहर, महादेव मुनावत, राहूल खरवडे, साहेबराव देवाळकर, सुभाष ढगे, हरिहर खरवडे, घनश्याम मोहीतकर, राकेश कामतवार, किशोर गोंडे, नरेश मामीडवार, चव्हाण, श्रीनिवास गोरे, आदींचा समावेश होता. (वार्ताहर)