प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:55 AM2018-02-18T00:55:14+5:302018-02-18T00:56:20+5:30
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शनिवारी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शनिवारी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात आले.
राज्य शासनाचे धरसोडीचे शैक्षणिक धोरण व शिक्षक विरोधी भूमिका घेतल्याने राज्यात शैक्षणिक असंतोष वाढला आहे. राज्यातील खासगी व स्थानिक संस्थांतर्गत माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी केंद्र शासनाप्रमाणे १ जानेवारी २०१६ पासून लागू कराव्यात, २० टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या राज्यातील सर्वच शाळांना वर्ग तुकड्यांना त्या पुढील टप्पा अनुदान विनाअट मंजूर करणे, तसेच निकषपात्र विना अनुदानीत शाळा-वर्गतुकड्यांना सरसकट अनुदान मंजूर करण्यात यावे, अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करावी, राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करावी, २३ आॅक्टोबर २०१७ चा जाचक शासन निर्णय रद्द करावा, सर्व अतिरिक्त शिक्षकांचे त्वरित समायोजन करावे आदी मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
यावेळी सरकार्यवाहक सुधाकर अडबाले, जगदिश जुनगरी, जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, लक्ष्मणराव धोबे, श्रीहरी शेंडे, दिगांबर कुरेकर, सुनील शेरकी, वसुधा रायपूरे, अनिल कंठीवार, शालिक ढोरे, नितीन जीवतोडे, अनिता अमृतकर, नाभिलास भगत आदी उपस्थित होते.