ओबीसीच्या माण्यासाठी एसडीओ कार्यालयासमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:28 AM2021-07-29T04:28:22+5:302021-07-29T04:28:22+5:30
मूल : ओबीसींचे २७ टक्के आरक्षण केंद्र सरकारने रद्द केले. ते पूर्ववत करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी अखिल ...
मूल : ओबीसींचे २७ टक्के आरक्षण केंद्र सरकारने रद्द केले. ते पूर्ववत करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार, ओबीसींना शिक्षण, नोकरी आणि शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी २७ टक्के आरक्षण कायम ठेवून तत्काळ लागू करावे, तसेच नीट व मेडिकलच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेमध्ये २७ टक्के आरक्षण देण्याचे निर्देश द्यावे आदी मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देशभरात आंदोलन सुरू आहे. मूल येथील समता परिषदेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार बाळू धानोरकर यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदन देताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, महिला कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव गुरू गुरनुले, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाधर कुनघाडकर, समता परिषद तालुका अध्यक्ष विक्रांत मोहुर्ले, राकेश मोहुर्ले, ओबीसी नेते मंगेश पोटावार, रूमदेव गोहणे यासह ओबीसी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.