ठाणेदाराचे कॉलर पकडून बुक्क्यांनी मारहाण
By admin | Published: September 25, 2016 01:17 AM2016-09-25T01:17:56+5:302016-09-25T01:17:56+5:30
पोलीस हवालदाराच्या कामात अडथळा व ठाणेदार बंदोबस्ताकरिता जात असताना अश्लील शिवीगाळ केली.
आरोपींना अटक : पोलीस गाडीचा आरशा तोडला
घुग्घुस : पोलीस हवालदाराच्या कामात अडथळा व ठाणेदार बंदोबस्ताकरिता जात असताना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर कॉलर पकडून तोंडावर व डोक्यावर बुक्याने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजतादरम्यान राजीव रतन दवाखान्या नजीक घडली. आरोपीने पोलीस वाहनाच्या आरशाला बुक्की मारून तोडले.
या प्रकरणी नैशाद शेख व विनेश कलवल यांच्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा, कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
चंद्रपूर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी सायंकाळी एक व्यक्ती पडून असल्याची माहिती फोनवरून ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार पोलीस हवालदार संतोष गुप्ता घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी लोकांच्या मदतीने त्या इसमाला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न करीत असताना नौशाद शेखने मोबाईल वर फोटो घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित लोकांनी ‘ आधी दवाखान्या नेऊ द्या, मग फोटो घ्या, असे म्हणताच ‘आज अंभोरे की उतारकेच रहुंगा’, असा दम देत अश्लील शिवीगाळ केली.
दरम्यान, घडलेल्या प्रकाराची माहिती पोहवा गुप्ता यांनी ठाणेदारला दिली. ठाणेदार अंभोरे केंद्रीय राज्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्ताकरिता व्हीआयपी गेस्ट हाऊसकडे जात असताना शिवीगाळ करणारे दोघेही राजीव रतन दवाखान्या समोरील दुकानात उभे असल्याचे दिसले. त्यांनी गाडी थांबवली असता शिवीगाळ करीत गाडीजवळ येऊन गाडीच्या साईड ग्लासला बुक्की मारून तोडला. गाडीत बसून असलेले ठाणेदार गाडीच्या खाली उतरत असताना त्यांचे कॉलर पकडून तोंडावर व डोक्यावर बुक्क्याने मारून इजा पोहोचविली. दरम्यान, सोबत च्या पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. शुक्रवारी नेहमीप्रमाणे विनेश कलवल हा नौशाद सोबत होता. त्याला मदत केल्यामुळे दोघांवर भादंवि ३५३, ३३३, २९४, ५०६, ४२७(३४) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार शुक्रवारपासून खमंग चर्चेचा विषय झाला आहे. (वार्ताहर)
आरोपीविरोधात खंडणीचे गुन्हे
नौशाद हा चंद्रपूरवरून प्रकाशित होणाऱ्या एका वृत्तपत्राचा स्थानिक बातमीदार म्हणून काम करतो. मागील काही दिवसांपूर्वी खंडणी, धमकी व मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून कळते.