कोरोनाच्या भीतीने होणार स्वदेशी रंगांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 11:15 PM2020-03-06T23:15:12+5:302020-03-06T23:15:44+5:30
कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने चिनमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी होळी, रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे साहित्य चिनमधून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरात येत होते. स्वस्त व आकर्षक म्हणून भारतीय ग्राहकही या वस्तूंकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनमधून पिचकाऱ्या, विविध प्रकारचे मास्क, बासरी, विविध प्रकारचे रंग, गॉगल्स, टोप्या, विविध रंगाचे केसांचे मुखवटे अशा वस्तू चिनमधून आयात होत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरसमुळे होळीचे साहित्य शहरात विक्रीसाठी आलेच नाही. परिणामी चंद्रपूर शहरवासीयांना स्वदेशी रंगावर होळी साजरी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने शहरातील बाजारपेठ सजली आहे. मात्र मंदीमुळे ग्राहकांची पावले अद्यापही होळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेकडे वढली नाही.
कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने चिनमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी होळी, रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे साहित्य चिनमधून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरात येत होते. स्वस्त व आकर्षक म्हणून भारतीय ग्राहकही या वस्तूंकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनमधून पिचकाऱ्या, विविध प्रकारचे मास्क, बासरी, विविध प्रकारचे रंग, गॉगल्स, टोप्या, विविध रंगाचे केसांचे मुखवटे अशा वस्तू चिनमधून आयात होत होत्या. या वस्तूला रंगपंचमीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.
मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यांच्या सुरुवातील चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरु झाला. तेव्हापासून साहित्य येणेच थांबले आहे. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी स्वदेशी माल विक्रीसाठी आणला आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे खरेदीसाठी येणार ग्राहक अमूक माल चायनाचा आहे काय, असा प्रश्न विचारुन खरेदी करतो. या परिस्थितीने दुकानदार अडचणीत आले आहे.
५० ते हजार रुपयांपर्यंत पिचकारा
बाजारपेठेमध्ये ५० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतच्या पिचकाऱ्या विक्रीसाठी आणल्या आहेत. त्यामध्ये छोटा भीम, निंजा, हातोळी अशा विविध प्रकारच्या आकर्षक पिचकाऱ्याला अधीक पसंती ग्राहक देत असल्याचे एका विक्रेत्यांने सांगितले. छोटे बालक तर क्रिश, स्पायडरमॅनच्या मास्कची अधिक मागणी करीत आहेत.
गाठीची खरेदी मंदावली.
होळीच्या दुसऱ्या दिवशी गाठी बांधण्याची पद्धत आहे. बाजारपेठेत लहान, मध्यम व मोठ्या प्रकारच्या गाठी ८० ते शंभर रुपये किलोच्या दरात उपलब्ध आहेत. मात्र होळी केवळ तीन दिवस बाकी असूनही ग्राहक गाठी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत आले नसल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली.
कलरपेक्षा स्प्रेला मागणी
पूर्वी गुलाल एकमेकाला लावून होळी साजरी करण्यात येत होती. मात्र आता विविध प्रकारचे आकर्षक रंग बाजारपेठेत उपलब्ध आहे. त्यातच आता स्प्रे कलर आल्याने युवावर्ग स्प्रे कलरची खरेदी करीत आहे. बाजारपेठेत ५० रुपयांपासून ५०० रुपयांच्या किंमतीचे स्प्रे कलर विक्रीला आहेत.