पोकळ शेंगामुळे सोयाबीनची उतारी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:58 PM2018-10-28T22:58:55+5:302018-10-28T22:59:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : कमी पावसामुळे यावर्षी सोयाबीनला पोकळ शेंगा लागल्याने सोयाबीनच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. राजुरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : कमी पावसामुळे यावर्षी सोयाबीनला पोकळ शेंगा लागल्याने सोयाबीनच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. राजुरा तालुक्यात बहुतांश ठिकाणी कमी पाऊस झाल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना एकरी तीन पोते सोयाबीनचे उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर केलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
यावर्षी बऱ्यापैकी पाउस येईल या आशेवर शेतकरी असतानाच गुलाबी बोंडअळीच्या भीतीपोटी यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली होती. सोयाबीन हे तीन महिन्याच्या कालावधीत होणारे पीक असल्याने दिवाळीत आर्थिक चणचण भागविण्यासाठी शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेतो. परंतू यावर्षी सोयाबीनच्या शेंगात दाणा भरत असतानाच अचानक पाऊस गायब झाला. पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगात दाणा भरला नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनला पोकळ शेंगा लागल्या. या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय होती, त्या शेतकऱ्यांनी सोयाबीनला पाणी देऊन कसेबसे सोयाबीनचे पीक जगविले.
यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला. ऐनवेळी पिकांच्या भरणीवर पाऊस आला नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. राजुरा तालुक्यातील बहुतांश भागात पाऊस पडला नसल्याने त्याचा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे . ज्या ठिकाणी वेळेवर पाऊस झाला त्या ठिकाणी सोयाबीनचे उत्पादन बऱ्यांपैकी झाले आहे. तर काही शेतकºयांना पावसाअभावी एकरी तीन पोते सोयाबीनचे एवढे कमी उत्पादन झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
शेतमाल हमीभावाचा कायदा गेला कुठे?
शासनाने शेतमाल हमीभावाचा कायदा केला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांना व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कमी भावात शेतमाल खरेदी करता येणार नाही, असा कायदा करण्यात आला. हमीभावापेक्षा शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून दंडाची तरतूद कायद्यात आहे. परंंतू व्यापाऱ्यांकडून शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करीत असल्याने शेतमाल हमीभावाचा कायदा गेला कुठे, असा सवाल शेतकरी विचारत आहे.
माझ्या अडीच एकर शेतात यंदा सोयाबीनचे पीक घेतले होते. परंतु पावसाअभावी सोयाबीनचा दाणा भरला नाही. त्यामुळे सोयाबीनला पोकळ शेंगा लागून उत्पादनात घट झाली आहे.
-प्रमोदन गजानन लांडे, शेतकरी, गोवरी