गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग, घर घेण्याचे स्वप्न कधी होणार पूर्ण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:21+5:302021-07-26T04:26:21+5:30
कोरोनाचा सर्वाधिक फटका बांधकाम विभागाला बसला आहे. मजुरांचा तुटवडा भासत आहे. त्यातच लोखंड, रेती, विटा, सिमेंट यांच्या दरामध्ये प्रचंड ...
कोरोनाचा सर्वाधिक फटका बांधकाम विभागाला बसला आहे. मजुरांचा तुटवडा भासत आहे. त्यातच लोखंड, रेती, विटा, सिमेंट यांच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. परंतु, शासकीय बँकेने विविध बँकेच्या स्पर्धेमध्ये गृहकर्जाच्या व्याजदरातमध्ये प्रचंड घट केली आहे. तसेच कर्जाची प्रक्रियासुद्धा सुलभ केली आहे. परिणामी गृहकर्ज मिळणे सोपे झाले आहे. परंतु, बांधकाम साहित्यात झालेल्या वाढीमुळे अनेकांचे घर बांधण्यासाठी अडचण जात आहे. त्यातच घरकुलाच्या लाभार्थ्यांना तोडकी रक्कम दिली जात असल्याने त्यांचे बांधकाम अर्धवट राहत असल्याचे वास्तव आहे.
बॉक्स
साहित्य विक्रेते म्हणतात
गेल्या वर्षभरात बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. सणाच्या मुहूर्तावर अनेकजण नवीन घराचे बांधकाम सुरू करतात. मात्र यंदा नवीन बांधकाम कमी असल्याचे दिसून येत आहे.
-प्रकाश रायपुरे, व्यावसायिक
------
दरवर्षी बांधकाम साहित्याच्या विक्रीला चांगला प्रतिसाद असायचा. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून मोठा फटका बसत आहे. नवीन घरासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी दिसून येत आहे.
-संतोष हेडाऊ, व्यावसायिक
----
घर घेणे कठीणच
कोरोनामुळे आर्थिक फटका बसला आहे. आजपर्यंतच्या जमापुंजीतून घर घेण्याचे स्वप्न होते. परंतु, बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने घर घेणे कठीण झाले आहे. महागाई कधी कमी होईल, याची प्रतीक्षा आहे.
संजय गेडाम
------
मागील काही वर्षांपूर्वीच जागा घेतली आहे. घर बांधकाम सुरू करण्याचा विचार करताच कोरोना आला. आता बांधकाम साहित्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सध्यातरी घराचे बांधकाम लांबणीवर नेले आहे.
-प्रशांत रायपुरे
-----
गावापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग
चंद्रपूर शहरापासून दहा ते बारा किमी अंतरावर घराच्या किमती काही प्रमाणात स्वस्त आहेत. परंतु, तेथील परिसरात पाहीजे त्या प्रमाणात सोयीसुविधा नाही. तसेच जाण्या-येण्याचा प्रश्न निर्माण होतो. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या असल्याने दुचाकीचा वापरही परवडत नाही.
चंद्रपूर शहरपासून आरवट, पडोली, देवाडा, दाताळा, चोरा, चिंचाळा आदी परिसरात जागा उपलब्ध आहेत. त्याचे दरही कमी आहेत. परंतु, शहरापासून लांब येत असल्याने अडचण जाते.
अनडायवर्ट जागा जरी स्वस्त मिळाली तरी तेथे घर बांधकामासाठी शासनाकडून लाभ मिळत नाही. तसेच बँकसुद्धा लोन देत नाही. त्यामुळे बांधकामाची अडचण आहे.
-----
असे आहेत गृहकर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया ६.७५
बॅंक ऑफ इंडिया ६.८०
बँक ऑफ महाराष्ट्र ७.००
एचडीएफसी ६.७५
आयसीआयसीआय ६.७५