निवासस्थानाची दुरवस्था

By admin | Published: July 17, 2016 12:40 AM2016-07-17T00:40:50+5:302016-07-17T00:40:50+5:30

ब्रिटीशकालीन घोडाझरी सिंचाई उपविभागाच्या उपविभागीय (उपअभियंता) अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली असून त्याकडे चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे

Home Remedies | निवासस्थानाची दुरवस्था

निवासस्थानाची दुरवस्था

Next

सिंचाई कार्यालय निरीक्षणगृहात : घोडाझरी विभागाचे ब्रिटीशकालीन निवासस्थान
सिंदेवाही : ब्रिटीशकालीन घोडाझरी सिंचाई उपविभागाच्या उपविभागीय (उपअभियंता) अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली असून त्याकडे चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मागील दहा वर्षांपासून या विभागाच्या उपविभागीय निवासस्थान व कार्यालयीन इमारतीच्या दुरुस्तीकडे तसेच परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
ब्रिटीश राजवटीत सिंदेवाही येथील हे एकमेव सुंदर व आकर्षक शासकीय निवासस्थान होते. या निवासस्थानाला १४० वर्ष पूर्ण होत आहे. ज्या काळात घोडाझरी तलावाची निर्मिती झााली. त्यावेळी तलावाचे काम बघण्यासाठी ब्रिटीश अधिकारी सिंदेवाही मुख्यालयात राहत होते. सिंदेवाहीवरुन घोडेस्वार होवून ते घोडाझरीला जात होते. या निवासस्थानाच्या मागच्या बाजूला ब्रिटीशांनी घोडे बांधण्याकरिता स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली होती. तसेच निवासस्थानापुढे व मागे बगीचा तयार केला होता. बैठकीकरिता एक मोठी खोली आहे. आता ब्रिटीशकालीन हे शासकीय निवासस्थान जीर्ण झाल्यामुळे त्या निवासस्थानाची दूरवस्था झाली आहे. पाटबंधारे विभागाने नवीन निवासस्थान व कार्यालयीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. नवीन इमारत झाल्यास ब्रिटीशकालीन इमारतीचा ठेवा नष्ट होईल. या उपविभागांतर्गत नवीन निरीक्षणगृह (विश्रामगृह) बांधण्यात आले होते. त्या निरीक्षणगृहात २० वर्षांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ शासकीय अधिकारी थांबत होते. परंतु पाटबंधारे विभागाने निरीक्षण गृहातच उपविभागीय कार्यालय सुरू केले आहे. (पालक प्रतिनिधी)

निरीक्षणगृहासमोरील बगीचा ओसाड
सिंदेवाही नगराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या येथील घोडाझरी निरीक्षण गृहाजवळील बगिचाची दुर्दशा झाली असून याकडे संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष झाले आहे. येथील बगिचा हा सिंदेवाहीकराचे आकर्षण होते. परंतु घोडाझरी सिंचाई उपविभागीय कार्यालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्यामुळे उपविभागीय सिंचाई कार्यालय निरीक्षणगृहात स्थानांतरित करण्यात आले. पूर्वी या निरीक्षणगृहात नागरिक व महिलांची सतत वर्दळ असायची. निरीक्षणगृह बंद झाल्यामुळे या निरीक्षणगृहासमोरील बगिचा ओसाड झाला आहे. या बगिच्यातील विविध प्रकारची फुलझाडे नष्ट झाली आहेत. बगिच्यात सर्वत्र गवत व अनावश्यक झुडुपे वाढली आहे. बगिच्यातील कारंजे व गार्डन लाईट बंद आहेत. आता या बगिच्यात कुणीही फिरकत नाही. याशिवाय घोडाझरी वसाहत परिसरातील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे लक्ष द्यायला कुणालाही सवड नाही.

रिक्त पदांमुळे कार्यालयात शुकशुकाट
सध्या घोडाझरी उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अभियंंता म्हणून एम.एन.रिजवी कार्यरत आहेत. घोडाझरी सिंचाई उपविभाग अंतर्गत एक घोडाझरी मध्यम प्रकल्प तर कुसर्ला, चिंधी, अड्याळ (मेंढा), मुडझा, करोली, गडमौशी, पवनपार, मरेगाव, खैरी नऊ लघु प्रकल्प व इतर २४ मामा तलाव मिळून एकूण ३४ तलावांचा समावेश आहे. उपविभागीय पाच शाखा कार्यालय अंतर्गत मोजणीदार मंजूर पदे १८ तर १७ पदे रिक्त, कालवा निरीक्षक मंजूर पदे ३५ तर २८ पदे रिक्त, दफ्तर कारकून मंजूर पदे नऊ तर चार पदे रिक्त असे मिळून एकूण ५० पदे रिक्त आहेत. सध्या पाच शाखेत केवळ १४ कर्मचारी कार्यरत आहेत.

Web Title: Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.