घरकूल प्रकरणांचा निपटारा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:26 AM2021-02-12T04:26:43+5:302021-02-12T04:26:43+5:30
बांबूअभावी बुरड कामगार अडचणीत मूल : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे; मात्र वन विभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा ...
बांबूअभावी बुरड कामगार अडचणीत
मूल : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे; मात्र वन विभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली जात आहे. कोरोनामुळे रोजगारांची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.
कोमल क्षीरसागर सुवर्णपदकाने सन्मानित
नागभीड : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत गोविंदराव वाजूरकर महाविद्यालय नागभीडची विद्यार्थ्यानी कोमल विजय क्षीरसागर हिने एमए मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल गोंडवाना विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. सी. शर्मा, कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी आदी उपस्थित होते.
मैदानी खेळाबाबत जनजागृती गरजेची
चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे. मात्र, सध्या मुले मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. मोबाइल गेमने हा ट्रेंडच बदलवून टाकला आहे. आता मुले मोबाईलवरच विविध खेळ खेळताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रोहयो कामांची संख्या वाढवावी
भद्रावती : तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. मात्र, कामांची संख्या कमी असल्याने अनेक जाॅबकार्डधारकांना कामे मिळत नाहीत. सध्या शेतीपासून पुरेसा रोजगार नाही.
बेरोजगार संस्थांना काम देण्याची मागणी
चंद्रपूर : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी जिल्ह्यात मोठ्या संख्येने बेरोजगार संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या संस्थांना कामच मिळत नसल्याने बेरोजगार कामाची मागणी करीत आहे. विशेष म्हणजे, शासनाने या संस्थांना काम देण्याचे आश्वासन दिले. मात्र, या संस्थांना अद्यापही पाहिजे तसे शासकीय कामच मिळत नसल्याची स्थिती आहे.
रस्त्यावरील झुडपे जीवघेणी
कोरपना: ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामळे झुडपे तोडून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वन्यप्राण्यांमुळे अपघाताची शक्यताही आहे.
रिक्त पदांमुळे कामे खोळंबली
जिवती : येथील तहसील कार्यालयात काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येतात. परंतु, कार्यालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे खोळंबली आहेत. रिक्त पदे भरून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी
चंद्रपूर : मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतीतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक स्रोत वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन तालुकानिहाय प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
नेटवर्कअभावी ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावात तसेच दुर्गम भागामध्ये विविध कंपन्यांसह बीएसएनएलचेसुद्धा नेटवर्क नाही. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. त्यातच ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेटवर्क समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे. परीक्षा तोंडावर आल्याने विद्यार्थी अभ्यासात गुंतले आहेत.
शासकीय उपक्रम राबविण्याची तयारी
बल्लारपूर : बामणी ग्रामपंचायतीच्या वतीने शासकीय उपक्रम राबविण्याची तयारी जोरात सुरू आहे. अलीकडेच शासकीय अधिकाऱ्यांनी येऊन सरपंच सुभाष ताजने, उपसरपंच जमील शेख व ग्राम विस्तार अधिकारी लक्ष्मण शेंडे यांना याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्या अनुषंगाने ग्रामसदस्यांशी चर्चा करून उपक्रम राबविण्याची तयारी सुरू आहे.
लालपेठ परिसरातील अतिक्रमण जैसे थे
चंद्रपूर : बाबूपेठ, लालपेठ परिसरात काही व्यावसायिकांनी रस्त्यावर दुकाने लावून अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी महानगर पालिकेकडे काही दिवसांपूर्वी केली होती. यासंदर्भात निवेदनही दिले आहे. मात्र, कारवाई झाली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
रस्त्यावरील पार्किंगमुळे नागरिक हैराण
मूल : गांधी चौक परिसरात रस्त्यावर वाहने पार्किंगसाठी ठेवली जातात. काही दिवसापूर्वी नगर परिषदेने दंडात्मक कारवाई केली होती़ पण कोरोनापासून कारवाई थंडावली़ या मार्गावर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना मार्गक्रमण करताना त्रास होत आहे.
सिमेंट रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करा
नागभीड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. पण ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कंत्राटदार हैराण आहेत. काही कामे कासवगतीने सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी निधीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्याची गरज आहे.
घुग्घुस तालुका निर्मितीचा प्रश्न प्रलंबित
घुग्घुस : जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या घुग्घुस शहराला तहसीलच्या दर्जा देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घुग्घुस हे औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. चंद्रपूर तालुक्याचा वाढता कारभार बघता स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महागाईमुळे सामान्य ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : मागील काही महिन्यामध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच महागाईमुळे जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शकचा अभाव
कोरपना : राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी ते राज्य सीमादरम्यानच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलक नसल्याने वाहतूकदारांची गैरसोय होत आहे. सदर महामार्ग जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचा महामार्गापैकी एक आहे. त्यामुळे दिवसरात्र या मार्गावरून अवागमन सुरू असते, परंतु दिशादर्शक, अंतर, वळण, गावाचे नाव असे मार्गदर्शक फलक लावण्यात आले नाही.
धूर फवारणी करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. महापालिका प्रशासनाने डासांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, काही मोकळ्या भूखंडावर आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे याचाही धोका नागरिकांना आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. डेंग्यूचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.