ग्रामसभा बळकट करणे हीच दादांना घरी श्रद्धांजली
By Admin | Published: June 9, 2017 12:51 AM2017-06-09T00:51:15+5:302017-06-09T00:51:15+5:30
८ जून २००६ रोजी अड्याळ टेकडीचे शिल्पकार गीताचार्य तुकारामदादा यांनी इहलोकीचा प्रवास संपविला असला तरी ..
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : ८ जून २००६ रोजी अड्याळ टेकडीचे शिल्पकार गीताचार्य तुकारामदादा यांनी इहलोकीचा प्रवास संपविला असला तरी त्यांच्या स्वप्नातील खेडे घडविण्यासाठी ग्रामसभांना मजबूत कसे करता येईल, याचा सांगोपांग विचार करून समस्त गुरूदेवभक्तांनी गीताचार्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
गीताचार्य तुकाराम दादा यांनी आपले अख्खे आयुष्य ग्रामगितेवर आधारित खेडे स्वयंभू कसे होतील, यासाठी खर्ची घातले. त्याचा उत्तम प्रयोग त्यांनी अड्याळ टेकडीवर केला. कुठलीही शासकीय मदत न घेता केवळ श्रमदानातून गावगणराज्याचे नंदनवन फुलविले. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचे कार्य सुरू होते. अड्याळ टेकडीवर दरवर्षी गीताचार्य तुकाराम दादा यांचा ८ जून रोजी स्मृतीदिन आयोजित करण्यात येतो. कोणाला कोणते निमंत्रण नाही. कोणाला कोणता सांगावा नाही. केवळ दादांवर असलेल्या श्रद्धेपोटी संपूर्ण विदर्भातून शेकडो गुरूदेवभक्त गुरुवारी अड्याळ टेकडीवर एकत्र आले होते. ज्या ठिकाणी दादांना चिरशांती देण्यात आली. अगदी त्याच ठिकाणी या गुरूदेवभक्तांनी एकत्र येवून दादांना श्रद्धांजली अर्पण केली. याठिकाणी झालेल्या सभेत दादांच्या स्वप्नातील गाव निर्माण करण्यासाठी ग्रामसभा कशा मजबुत करता येतील, यावर विचारमंथन करण्यात आले.
जल, जंगल आणि जमीन यावर ग्रामसभेचा अधिकार आहे. एरवी ग्रामसभांना लोक येत नसले तरी ग्रामसभेच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती झाली तर लोकांचे ग्रामसभेकडे आकर्षण वाढेल आणि ते ग्रामसभांना हजेरी लावतील. यासाठी ग्रामसभेतून रोजगार निर्मिती कशी होईल, याचा विचार करण्यात आला. ग्रामसभेच्या अधिकाराची माहिती देण्यात आली. ग्रामसभांच्या बळकटीकरणासाठी गुरुदेवभक्तांनी पुढे आले पाहिजे. हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. असे विचारही व्यक्त करण्यात आले.