भद्रावतीतील बेघरांना मिळणार घरे
By admin | Published: April 30, 2017 12:33 AM2017-04-30T00:33:57+5:302017-04-30T00:33:57+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित या योजनेची अंमलबजावणी नगर परिषद भद्रावतीमध्ये सुरू झाली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना : नगरपालिकेत योजनेची अंमलबजावणी
भद्रावती : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित या योजनेची अंमलबजावणी नगर परिषद भद्रावतीमध्ये सुरू झाली आहे. ही योजना चंद्रपूर जिल्ह्यात चार नगरपालिकांमध्ये लागू असुन त्यामध्ये भद्रावती नगरपालिकेचा समावेश आहे. अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याकरिता शहर स्तरीय तांत्रिक कक्षाची उद्घाटन नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव तसेच यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या योजनेअंतर्गत एकूण चार उपयोजनांचा समावेश आहे. या चार उपयोजनापैकी वैयक्तिक घरकूल बांधकाम या उपयोजनेअंतर्गत अर्जाची सुरूवात झालेली आहे. त्यामध्ये लाभार्थ्यांकडे संपूर्ण देशात कुठेही घर नसणे ही अट आहे. ज्या लाभार्थ्यांकडे स्वत:च्या मालकीची जागा आहे, परंतु घर नाही, अशा लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार होईल.
तसेच ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची जागा व घर नाही, अशा लाभार्थ्यांची वेगळी यादी तयार करण्यात येईल. ही योजना आधारकार्ड व बायोमॅट्रीक प्रणालीशी निगडीत आहे. या योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या सदनीकांची विक्री पुढील १० वर्षांपर्यंत लाभार्थ्याला करता येणार नाही.
लाभार्थ्याने कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. कोणत्याही मध्यस्थी, एजंट, दलाल याचे प्रलोभनास बळी पडू नये. असे काही आढळल्यास त्यांचेवर सक्त कारवाई करण्यात येईल. तीव्र उन्हाळा लक्षात घेता अर्ज स्वीकारण्याकरिता नगरपालिकेने २८ एप्रिल ते २० मे रोजीपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते ६ वाजेपावेतो अर्ज स्वीकारले जाईल.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी या योजनेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक नगरपालिकेचे कर निरीक्षक चरणदास शेडमाके यांनी केले.
(तालुका प्रतिनिधी)
संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज
लाभार्थ्यांने नगरपालिकेचा चालू वर्षाचा संपूर्ण कराचा भरणा करणे आवश्यक आहे. याप्रसंगी सदर योजनेची माहिती देताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी असे सांगितले की, सदर योजना ही सर्वांसाठी घर योजना असल्यामुळे पात्र असणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांना घरे मिळणार आहेत. त्यासाठी रितसर आॅनलाईन अर्ज संकेतस्थळावर सादर करावेत. त्याकरिता कार्यालयीन कक्ष निर्माण करण्यात आला आहे. नगरपालिकेचे अभियंता सुरेंद्र चोचमवार व स्वप्नील पिदूरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.