शहिदांचा सन्मान, पण ब्रह्मपुरीच्या अन्यायाविरोधात एल्गार
By Admin | Published: July 30, 2016 01:24 AM2016-07-30T01:24:00+5:302016-07-30T01:24:00+5:30
शासनाने नवीन जिल्हे निर्मितीचे प्रस्ताव मागितले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
निवेदन सादर : ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी ६ आॅगस्टला बंदचे आयोजन
रवी रणदिवे ब्रह्मपुरी
शासनाने नवीन जिल्हे निर्मितीचे प्रस्ताव मागितले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. शासनाच्या यादीत ब्रह्मपुरी व चिमूर या दोन ठिकाणांपैकी एकाला जिल्ह्याचे स्थान देण्याविषयी हालचाली सुरू आहेत. पण केवळ चिमूरची पार्श्वभूमी शहिदांची क्रांती भूमी पर्यंतच आहे.
ब्रह्मपुरीकरांना शहिदांचा सन्मान आहे. पण ब्रह्मपुरीवर १९८२ पासून होणारा जिल्हा निर्मितीचा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही, असा एल्गार रूख्मिणी सभागृहात पार पडलेल्या सर्वपक्षीय, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारी व विद्यार्थी, महिला संघटनेने निर्धार करून हजारोच्या साक्षीने ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यापुढील रूपरेषा ठरविण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुभाष बजाज होते.
शहिदांची भूमी म्हणून केवळ भावनिक आधारावर जिल्हा देणे हे नागरिकांच्या सोयीचे नाही. जिल्ह्याच्या स्थळाला जी चारही अंगाने पार्श्वभूमी पाहिली जाते, ती ब्रह्मपुरीला प्रदान झाली आहे. येथे सर्वांना सोयीचे होईल व आजुबाजूच्या कोणत्याही गावाला त्रास होणार नाही, असे भौगोलिक, दळणवळण व भौतिक सुविधा उपलब्ध असूनही १९८२ पासून ब्रह्मपुरीला वगळले जात आहे. हा खर तर शहीद स्व. गोपाळराव हर्षे, बालाजी मेश्राम व अन्य शहिदांचा अपमान आहे. तो अपमान यापुढे खपवून घेणार नाही व तिला प्राप्त केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार या बैठकीच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी केला.
या बैठकीनंतर जिल्हानिर्मितीचे हजारो समर्थक नारे व घोषणाबाजी करून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. बैठकीमध्ये जिल्हानिर्मितीचा कार्यक्रम टप्पा ठरविण्यात आला. त्यानुसार ६ आॅगस्टला ब्रह्मपुरी बंद ठेवून मागणी रेटून धरण्याचा मानस निश्चित केला आहे. त्यानंतर क्रमाक्रमाने धरणे आंदोलन, उपोषण, रस्ता रोको यासारखे कार्यक्रम राबवून जिल्हा निर्मितीचे लक्ष प्राप्त करण्याविषयी ठरविले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा निर्मितीचे पथक मुंबईला जाऊन मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करण्याचे ठरविण्यात आले आहे.
जिल्हा निर्मितीचे आंदोलन उफाळण्याची शक्यता - ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी सर्वसारांचा समावेश केल्याने हे आंदोलन जनआंदोलन म्हणून उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राजकीय शक्तींची परीक्षा - या निमित्ताने आजी व माजी आमदारांचा राजकीय शक्तीची परीक्षा पाहण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. मागणीला पाठबळ किती लावून येतात, ते या शक्तीवर अवलंबून आहे.
नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा समावेश :- जिल्हा निर्मितीसाठी नव्या दमाच्या तरुणांना सोबत घेऊन जिल्ह्याची मागणी रेटून धरण्यात येणार असल्याने तरुणांत उत्साह संचारलेला दिसून येत होता.
महिला वर्गाची उपस्थिती :- सभेत व निवेदन देताना महिला वर्ग उपस्थित असल्याने महिला वर्गाची उपस्थिती ही महत्वाची ठरणारी आहे.
सर्वपक्षीय घटकांचा समावेश :- जेष्ठ नागरिक संघटना, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विविध पक्षांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, महिला, डॉक्टर, प्राध्यापक व अन्य मंडळी बैठकीला उपस्थित होते.