आर्य वैश्य समाजातर्फे अर्थमंत्री व महापौरांचा सत्कार
By admin | Published: May 28, 2016 01:07 AM2016-05-28T01:07:15+5:302016-05-28T01:07:15+5:30
अत्यल्प प्रमाणात असलेल्या आर्य वैश्य समाजातून स्वबळावर, आपल्या कर्तृत्वातून राजकीय क्षेत्रात छाप सोडणारे...
मुनगंटीवारांचे प्रतिपादन : समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर
गोंडपिंपरी : अत्यल्प प्रमाणात असलेल्या आर्य वैश्य समाजातून स्वबळावर, आपल्या कर्तृत्वातून राजकीय क्षेत्रात छाप सोडणारे व समाजासाठी प्रेरणास्थान ठरणारे राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार यांचा स्थानिक कन्यका माता सभागृहात बुधवारी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून विलासराव माडूरवार होते तर स्वागताध्यक्ष प्रमोद उत्तरवार व सुनील वेगीनवार होते. यावेळी सत्कारमूर्ती ना. सुधीर मुनगंटीवार व महापौर राखी कंचर्लावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दीप प्रज्वलन, स्वागत गीत व नृत्याने कार्यक्रमाला सुरूवात झाली. जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, नगरपालिकेचे सभापती प्रवीण नरहशेट्टीवार, डॉ. अनिल माडूरवार, सुभाष कासनगोट्टूवार, रोशनी अनमूलवार व अन्य समाज भूषणांचा सत्कार आयोजन समितीमार्फत स्वप्नीन बोनगीरवार यांनी केला.
यानंतर आर्य वैश्य समाजाच्या वतीने ना. मुनगंटीवार व महापौर राखी कंचर्लावार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना मुनगंटीवार म्हणाले, समाजासह अन्य समाजातील प्रत्येक दीनदुबळ्या, दलित घटकांची जबाबदारी माझ्यावर असून संपूर्ण राज्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचा विकास दर हा भाजप सरकारने वाढविला असून राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महापौर राखी कंचर्लावार यांनी महिलांना राजकारणात येण्यासाठी आवाहन करीत ना. मुनगंटीवारांच्या कार्यपद्धतीचा आढावा सांगितला. संचालन कासनगोट्टूवार, प्रास्ताविक अनंत माडूरवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)