संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांचें मानधन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:35+5:302021-09-07T04:33:35+5:30
देवाडा : राजुरा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन मागील दोन महिन्यांपासून रखडल्याने लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...
देवाडा : राजुरा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन मागील दोन महिन्यांपासून रखडल्याने लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकार पुरस्कृत संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ, वयोवृद्ध, अपंग इत्यादी लोककल्याणकारी योजना शासनाने सुरू केल्या. परंतु, संबंधित लाभार्थ्यांचे मानधन दोन महिन्यांपासून मिळाले नसल्याने चूल पेटविणे कठीण झाले आहे. लाभार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी राजुरा येथे बँकेत जावे लागते. बँकांमध्ये गेले तर पैसे आले नाहीत, असे उत्तर दिले जाते. तहसील कार्यालयात जाऊन विचारा असे म्हटले तर नाईलाजाने आपल्या घरी रिकाम्या हाताने परत यावे लागते. महिन्यात दोन-चार चकरा माराव्या लागतात. मात्र, निराधार लाभार्थ्यांचे मानधन काही बँकेत जमा केले जात नाही. विशेष म्हणजे, शासनाकडून मिळत असलेल्या तुटपुंज्या रकमेच्या भरवशावर लाभार्थ्यांना महिनाभर सांभाळून खर्च करावा लागतो. मात्र, दोन महिन्यांचे मानधन मिळेल व पोळा सण साजरा करता येईल, असे लाभार्थ्यांना वाटले होते. परंतु तसे झाले नाही. उसनवारी करून दवाखाना, औषधोपचार करावा लागत आहे. निराधारांची ही अडचण दूर करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.