सीमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:26 AM2021-02-14T04:26:27+5:302021-02-14T04:26:27+5:30
मूल : देशाचे रक्षक हे त्या देशाच्या सीमेवर पहारा देणारे सैनिक असतात. पहारा देणाऱ्या या सैनिकांमुळेच देशातील जनता सुखाची ...
मूल : देशाचे रक्षक हे त्या देशाच्या सीमेवर पहारा देणारे सैनिक असतात. पहारा देणाऱ्या या सैनिकांमुळेच देशातील जनता सुखाची शांत झोप घेत असतात. सीमेवर पहारा देऊन अलीकडेच निवृत्त झालेल्या तालुक्यातील सैनिकांचा महिला भरारी बचत गटाच्या वतीने स्थानिक कन्नमवार सभागृहाच्या प्रांगणात सत्कार करण्यांत आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूल तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गडेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक बाबा सुर, वासुदेव जंबुलवार, बाबाजी मेश्राम, संतोष खोब्रागडे आदि उपस्थित होते.या कार्यक्रमात ९ गार्ड रेजिमेंट मधील निवृत्त हवालदार प्रशांत एकनाथ पाटील, २५ मराठा रेजीमेंन्टचें नायक प्रकाश महाडोळे आणि १०३ बाॅंम्बे इंजिनिअर रेजिमेंन्ट मधील नायक प्रकाश झरकर यांनी आपला कार्यकाल पूर्ण करून अलीकडेच निवृत्त होऊन स्वगावी परतले. याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यांत आला. यावेळी सत्कारमूर्ती माजी सैनिकांनी सेवाकाळातील अनुभव सांगताना सत्काराप्रति कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन कविता मोहुर्ले प्रास्ताविक अंजली सुर यांनी केले. तर उपस्थिताचे आभार सुनिता खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बचत गटाच्या उपाध्यक्ष पुष्पलता जंबुलवार, वितना खोब्रागडे, मीनाक्षी महाडोळे, रेखा रामटेके, प्रतीक्षा भसारकर, पंचशिला खोबागडे, नलिनी मेश्राम, रिया जुनीसा शेख, कविता गडेकर आणि उज्ज्वला रंगारी यांनी परिश्रम घेतले.