पणन महासंघाच्या कापूस खरेदीची आशा धुसर
By admin | Published: November 17, 2014 10:50 PM2014-11-17T22:50:39+5:302014-11-17T22:50:39+5:30
पणन महासंघातर्फे राज्यात २७ केंद्रावरुन कापूस खरेदी सुरू झाली आहे. मात्र ज्या केंद्रावर सीसीआयची खरेदी सुरू आहे तेथे पणन महासंघ त्यांचे केंद्र सुरू करणार नाही असे दिसत आहे. त्यामुळे कोरपना
जयंत जेनेकर - वनसडी
पणन महासंघातर्फे राज्यात २७ केंद्रावरुन कापूस खरेदी सुरू झाली आहे. मात्र ज्या केंद्रावर सीसीआयची खरेदी सुरू आहे तेथे पणन महासंघ त्यांचे केंद्र सुरू करणार नाही असे दिसत आहे. त्यामुळे कोरपना येथे सीसीआयची कापूस खरेदी सुरू असल्याने पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू होईल की, नाही याची आशा आता धुसरच दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरपना, वरोरा, चंद्रपूर, महाकुर्ला, टेमुर्डा, माढेळी, राजुरा, नागरी येथे कापूस खरेदी केंद्र आहे. यातील काही कापूस खरेदी केंद्र खासगी व्यापाऱ्यांची आहे. येथे कापूस खरेदीला प्रारंभ झाला आहे. सद्य:स्थितीत कोरपना व वरोरा येथे सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली आहे.
कोरपना येथे गेल्या दोन वर्षापासून पणनने कापूस खरेदीच न केल्याने या भागातील शेतकऱ्यांना आपला माल वणी, वरोरा, आदिलाबाद, मारेगाव, शिंदोला, आबई, वाकडी आदी ठिकाणी नेऊन विकावा लागला. कापूस उत्पादनात अग्रेसर असताना येथील जिनींग उद्योग डबघाईस येण्याच कारण अद्यापही कुणालाच उमजले नाही. गेल्या वर्षीही खासगी व्यापाऱ्यांनी जिनींगमध्ये कापूस खरेदी केली. परंतु पणनने खरेदी केली नाही.
यंदा मात्र सीसीआयने येथे खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी लुट काही अंशी थांबली आहे. मात्र यंदा शेतकऱ्यांना मिळणारा दर सीसीआयच्या नियमानुसार मिळणार असल्याचे समोर येत आहे. सीसीआय धाग्याच्या लॉबीवरुन कापसाचे दर ठरविते त्यामुळे पणनही याच नियमानुसार दर देणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.
सीसीआयच्या खरेदीसोबतच पणन महासंघाने येथे खरेदी करावी अशी मागणी आता तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांची दरवर्षी खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लुट थांबण्यासाठी वेळेतच कापूस खरेदी सुरू करणे आवश्यक आहे. येथे त्वरित पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याची पणन महासंघाने तत्काळ दखल घेऊन प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)