तांदळाच्या वाणांचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना शासकीय मदतीची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 02:04 PM2018-05-22T14:04:01+5:302018-05-22T18:41:20+5:30

तांदळाचे संशोधक म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे सध्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. शासनाने उपचारासाठी मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

Hope for government help researcher of rice varieties Dadaji Khobragade | तांदळाच्या वाणांचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना शासकीय मदतीची आशा

तांदळाच्या वाणांचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना शासकीय मदतीची आशा

googlenewsNext
ठळक मुद्देतीन वर्षांपासून अर्धांगवायूने ग्रस्तकुटुंबिय करतात मोलमजुरीनऊ प्रकारच्या वाणांचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामीण भागातील तांदळाचे संशोधक म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे सध्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. अर्धांगवायूने त्यांचे शरीर सुन्न झाले. शासनाने उपचारासाठी मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सध्या ते बोलू शकत नाही. त्यांचे जेवणही बंद झाले आहे. ते सलाईनवर असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉ. भारत गणवीर यांनी नातेवाईकांना सांगितले आहे.
१९८३ मध्ये ते तांदळाचे संशोधक म्हणून समोर आले. त्यांचे शिक्षण जेमतेम इयत्ता तिसरीपर्यंत झाले. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणसुद्धा घेता आले नाही. मात्र त्यांनी आपल्या शेतात धान पीक लावून त्यावर संशोधन केले. दादाजींनी धान संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. आता त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. एचएमटीसारख्या वाणाची निर्मिती करणाऱ्या या कृषितज्ज्ञाचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. सरकार आणि समाजालाही आज या सच्चा संशोधकाची आठवण राहिलेली नाही.
शरद पवारांपासून ते डॉ. अब्दुल कलाम यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांना सन्मानित केले आहे. परंतु मान-सन्मानांनी पोट भरत नाही, या वास्तवाचा अनुभव दादाजींचे कुटुंबीय घेत आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनावर अनेक लोक श्रीमंत झाले; पण दादाजींची परिस्थिती आहे तशीच आहे. एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे, असा त्यांचा परिवार आजही मोलमजुरी करूनच जगतो आहे. अंथरुणाला खिळलेल्या या संशोधकाची उपेक्षा कधी संपणार, हा खरा प्रश्न आहे.
अवघ्या दीड एकर शेतीत त्यांनी धानपिकाचे विविध यशस्वी प्रयोग केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत फोर्ब्सने २०१० मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते. ५ जानेवारी, २००५ रोजी अहमदाबाद येथे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर २००६ मध्ये महाराष्ट्र शासनाने देखील त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
त्यांच्या नावावर नऊ धान वाण विकसित करण्याचा विक्रम आहे. त्यांनी विकसित केलेली धानाची प्रजाती आजही देशाच्या विविध भागात उत्पादित केली जाते. सामान्यातून आलेल्या या धान संशोधकाला तीन वर्षांपूर्वी अर्धांगवायूने ग्रासले. तीन वर्षांपासून ते अंथरुणावर खिळले आहेत. आपले ज्ञान उदारपणे लोकांना वाटणाºया दादाजींना आयुष्याच्या उत्तरार्धात लहान-लहान गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. सकाळी तहसीलदार समीर माने यांनी भेट दिली. त्यांनी शासकीय मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, अशी माहिती दादाजी खोब्रागडे यांचे नातू विजय मित्रजीत खोब्रागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

नऊ वाणांचा शोध
एचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू हे नऊ तांदळाचे वाण दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केले आहे.

दादाजी खोब्रागडे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना रक्तदाब असून वयानुसार रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली आहे. ते घरीच उपचार घेत होते. आता रुग्णालयात उपचार सुरू आहे.
-डॉ. भारत गणवीर, शत:आयु हास्पिटल, ब्रह्मपुरी.

Web Title: Hope for government help researcher of rice varieties Dadaji Khobragade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी