दरवाढीच्या आशेने कापूस घरातच तुंबून
By Admin | Published: November 28, 2015 02:01 AM2015-11-28T02:01:45+5:302015-11-28T02:01:45+5:30
घरात जागा नसतानाही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापूस घरात भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करून आपली अडचण भागविली.
शेतकऱ्यांना जागेची पंचाईत : मायबाप सरकारवरच दरवाढीची आस
प्रकाश काळे गोवरी
घरात जागा नसतानाही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापूस घरात भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करून आपली अडचण भागविली. मात्र मायबाप सरकार आतातरी शेतकऱ्यांवर मेहरबान होईल आणि कापूस दरवाढ करेल, या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी घरीच कापूस ‘हाऊसफुल’ करून ठेवला आहे.
कापूस पिकाचे दिवस आज वाईट आले आहे. विदर्भातील कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. शेतकऱ्यांचा वर्षभराचा बजेट कापूस या एकमेव पिकांवर अवलंबून असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. उसनवारीने कर्ज काढून शेती पिकविली. मायबाप सरकार कापसाला यावर्षी चांगला भाव देईल, अशी आस शेतकऱ्यांना होती. मात्र सरकारने मागील वर्षीच्या तुलनेत केवळ ५० रुपये दरवाढ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला यावर्षीही पाने पुसली.
शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट असताना, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देणारे एकही राजकीय पुढारी शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घ्यायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांनी कापसाची कवडीमोल भावात विक्री करून आपली अडचण भागविली. शासनाने जाहीर केलेला चार हजार १०० रुपये हमीभाव म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर तात्पुरती मलमपट्टी लावण्यासारखा आहे. एवढ्या कमी कापूस दराने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघणार नाही. मग शेतकऱ्यांनी नुकसान सहन करून कापूस विकायचा काय, हा एकच प्रश्न शेतकऱ्यांना छळतो आहे. मात्र शेतकऱ्यांच्या दु:खावर शासकीय यंत्रणेला कायमस्वरूपी उपाय शोधता आलेले नाही.
कापूस घरी भरून ठेवला असल्याने शेतकऱ्यांच्या घरी राहायलाही जागा शिल्लक नाही. अनेक शेतकऱ्यांच्या घरी जागेअभावी कापसावरच झोपून रात्रं काढत आहेत. मात्र हे शेतकऱ्यांचे धकधकते वास्तव एकाही राजकीय पुढाऱ्यांना का दिसत नाही, हा एकच सवाल शेतकऱ्यांच्या काळजाला पिळ पाडणारा आहे. निवडणूक काळात शेतकऱ्यांच्या काळजातून बोलणारे राजकीय नेते कुठे गेले, हे आता कळायला मार्ग नाही.
कापूस दरवाढीसाठी वेळप्रसंगी जिवाची बाजी लावून रस्त्यावर उतरणारे शेतकऱ्यांचे कैवारी दोन-चार वर्षात कुठे आंदोलन करताना दिसले नाही आणि तसे केलेही असेल. तरी ही हाक मायबाप सरकारला का ऐकता आली नाही, यावर आज विचारमंथन करण्याची वेळ आली आहे.