घोडाझरी तलाव ‘ओव्हरफ्लो’च्या टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:12 AM2019-08-07T00:12:31+5:302019-08-07T00:12:57+5:30
पूर्व विदर्भात पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलाव आता ओव्हरफ्लोच्या टप्प्यात आला आहे. याकरिता आणखी पावसाची गरज आहे. हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यास पर्यटकांची मोठी गर्दी वाढू शकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : पूर्व विदर्भात पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलाव आता ओव्हरफ्लोच्या टप्प्यात आला आहे. याकरिता आणखी पावसाची गरज आहे. हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यास पर्यटकांची मोठी गर्दी वाढू शकते.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाची सोय व्हावी, याकरिता इंग्रजांनी १९०५ रोजीे घोडाझरी तलावाची निर्मिती केली. या तलावामुळे सिंदेवाही व नागभीड तालुक्यातील १५ हजार एकर शेतीला लाभ होत आहे. सिंचनासोबतच तलावाचा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो पर्यटक पावसाळ्यात तलावावर येतात. घोडाझरीला भेट देण्याची मजा काही औरच असते. तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यावरून फेसाळलेले ओसंडून वाहणारे पाणी, ठिकठिकाणचे लहान धबधबे, तुडूंब जलाशय, तिन्ही बाजूला नैसर्गिक टेकड्या आणि टेकड्यांवरील हिरवी गर्द वनराई हे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. निसर्गाचे हे लोभस रूप डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांची पावले घोडाझरी तलावाकडे वळतात. परंतु, पाच वर्षांपासून हा तलाव ओव्हरफ्लो झाला नाही. २०१३ रोजी शेवटचा ओव्हरफ्लो झाला होता.