भाविकांचे आकर्षण ठरतोय घोडा रथयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 10:07 PM2019-02-08T22:07:52+5:302019-02-08T22:08:14+5:30
३९२ वर्र्षांच्या इतिहासाची दीर्घ परपंरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराची महाराष्ट्राचा तिरूपती बालाजी म्हणून ओळख आहे. रविवारी वसंत पंचमीला यात्रा सुरू होणार असून हजारो भाविक सहभागी होणार आहेत.
राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : ३९२ वर्र्षांच्या इतिहासाची दीर्घ परपंरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराची महाराष्ट्राचा तिरूपती बालाजी म्हणून ओळख आहे. रविवारी वसंत पंचमीला यात्रा सुरू होणार असून हजारो भाविक सहभागी होणार आहेत.
१७०४ मध्ये चिमूर येथील शेतकरी भिकुजी डाहुले पाटील यांनी जनावरांच्या गोठ्यासाठी जमीन खोदायला सुरुवात केली. एका जागेवर कुदळ मारताच धातुचा आवाज आला. तेव्हा पाटलांनी खोदकाम थांबविले. रात्री स्वप्न पडल्यानंतर खोदकामाला सुरूवात केली. खोदकामामध्ये एक सुंदर मूर्ती आढळली, अशी आख्यायिका पूर्वजांकडून सांगितली जाते. जानोजी भोसले यांनी पेशव्यांचे सरदार देवाजी पंत चोरघडे यांच्या विनंतीवरून १७५० मध्ये चिमूर येथे २०० एकर जमीन मंदिर उभारणीसाठी दान दिली. तटबंदीयुक्त असलेल्या मंदिराला उंच प्रवेशद्वार असुन त्यावर कोरीव काम केले आहे. लाकडी सभा मंडपात १२ खांब आहेत. हत्ती व वाघाचे चित्र कोरण्यात आले. चार दगडी खांब असलेला सभामंडप आहे. श्रीहरी बालाजी श्री मूर्ती आणि तिरूपती बालाजीची मूर्ती सारखीच आहे. मंदिराच्या आवारात एक गरूड खांब आहे. बाहेर काही पुजाऱ्यांच्या समाध्या बांधल्या आहेत. श्री बालाजी महाराज मंदिरात दरवर्षी माघ शुद्ध पंचमीला नवरात्र प्रारंभ होते. माघ त्रयोदशीला रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत भव्य लाकडी घोडा रथावरून श्रीहरी बालाजी महाराजाच्या प्रतिमेची शहरातून मिरवणुक काढली जाते. मिरवणुकीला ‘रातघोडा’ असे म्हणतात.
रातघोडा उत्सवाला हजारो भाविक उपस्थित राहून दर्शन घेतात. तिसºया दिवशी दुपारी १२ ते ३ वाजता दरम्यान गोपालकाला करून मुख्य यात्रेचा समारोप करण्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र घोडा रथयात्रा सलग १५ दिवस सुरू राहते. महाशिवरात्रीला यात्रेची सांगता होते. घोडा रथयात्रेत विविध प्रकारच्या मनोरंजनाचे खेळ लावल्या जातात. सर्कस, आकाश पाळणा, खेळण्यांची विविध दुकाने व मिना बाजारात मोठी गर्दी उसळते. यात्रेत सहभागी होणाºया भाविकांसाठी नगरपरिषद, स्वयंसेवी संघटना तसेच लोकप्रतिनिधींकडून सोईसुविधा पुरविल्या जातात.
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
वसंत पंचमीला रविवारी रात्री ८ ते १० वाजता विनोदबुवा खोंड महाराज यांचे नारदीय कीर्तन होणार आहे. १७ फेब्रुवारीला रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत रातघोड्याची मिरवणूक निघेल. धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचल राहणार आहे. २० फेब्रुवारीला दुपारी १२ ते ३ वाजतादरम्यान गोपालकाला कीर्तन झाल्यानंतर यात्रेची सांगता होईल. यात्रा महोत्सव महाशिरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.