झोपडपट्टीवासीयांचा महामेळावा
By admin | Published: April 28, 2016 12:46 AM2016-04-28T00:46:33+5:302016-04-28T00:46:33+5:30
पडोली नागरिक कृतीतर्फे पडोली परिसरातील झोपडपट्टीवासीयांचा महामेळावा पडोली येथील लोकसेवा मंगल कार्यालयात...
चंद्रपूर : पडोली नागरिक कृतीतर्फे पडोली परिसरातील झोपडपट्टीवासीयांचा महामेळावा पडोली येथील लोकसेवा मंगल कार्यालयात ज्येष्ठ पत्रकार व नागरिक कृती समितीचे अध्यक्ष किशोर पोतनवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या मेळाव्याला संबोधित करताना विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप यांनी २५-३० वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने विहीत स्वरूपात अर्ज केल्यास शासनाला पट्टे देण्याचा अधिकार आहे, अशी कायदेशीर बाजू सांगितली. राष्ट्रवादीचे हिराचंद बोरकुटे आणि शशी देशकर यांनी रेल्वे लाईन परिसरातील झोपडपट्टीवासियांनी रेल्वेच्या जागेवर आपला हक्क सांगण्याऐवजी शासनाला पर्यायी जागेची मागणी करावी, असा सल्ला दिला.
प्रकाश रेड्डी यांनी लहूजी नगरच्या रहिवाशांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करण्यात यावी, अशी आग्रही भुमिका मांडली. पुरोगामी महिला समितीच्या अध्यक्ष यशोधरा पोतनवार यांनी महिलांनी आपल्या हक्कासाठी लढण्याचे आवाहन केले. मनसेच्या राजू कुकडे यांनी झोपडपट्टीवासियांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याची गरज असल्याचे सांगून मनसे सर्वशक्तीनिशी लढ्यात सहभागी राहील, असे आश्वासन दिले. किशोर पोतनवार यांनीही आपले विचार मांडले. पठाण यांनी झोपडपट्टीवासियांच्या व्यथा मांडल्या. प्रास्ताविक आणि आभार माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश गावंडे यांनी मानले. पडोलीला तहसीलचा दर्जा देण्यात यावा, असा प्रस्ताव पारीत करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मितीन भागवत यांनी केले.
रखरखत्या उन्हात पडोली परिसरातील इंदिरानगर, आमटा वार्ड, लहुजीनगर, गगनगिरी, खुटाळा आदी झोपडपट्टीवासीय जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. महामेळावा यशस्वी करण्यासाठी संतोष यादव, प्रकाश रेड्डी, किरण सोनी, सुरैय्या अंजुम, मंगला मेश्राम, निर्मलाबाई मारवाडे, शशिबाई विश्वकर्मा, देवकुमार विश्वकर्मा, बाबरखा पठाण, रियाजभाई, सज्जाद चाचा, इंदिराबाई मुरमाडे, निवृत्ता नंदागवळी, मंगला गावंडे, आशा गावंडे, भिमराव ठमके, सईदा शाहिदा शेख, शोभा तुपकर, वर्षा चंद्रिकापुरे, लालकन ठाकूर, रमेश जवादे, कवडू ढोके, गुलाब बोबाटे, शकीलखाँ पठाण, नागेश निखाडे, विलास शेलाटे, राजेश कुबेर आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)