घरकुलाचे लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:18 AM2021-07-05T04:18:01+5:302021-07-05T04:18:01+5:30
मूल : नगरपरिषद मूल क्षेत्रातील गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील गरजूंना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जानेवारी २०२० मध्ये ...
मूल : नगरपरिषद मूल क्षेत्रातील गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील गरजूंना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जानेवारी २०२० मध्ये घरकुल मंजूर करण्यात आले. त्यात ४० हजार रुपयेप्रमाणे दोन हप्ते देण्यात आले. अनेकांनी आपले घर पाडून घरकुल बांधकाम सुरू केले. बांधकाम सुरू करून अर्धे बांधकाम मिळालेल्या रकमेतून करण्यात आले. मात्र त्यानंतर निधी न मिळाल्याने अर्धवट बांधकामामुळे पावसाळा कसा काढावा, असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
शासनाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी घरकुल योजना सुरू केली. नगरपरिषद क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या लाभार्थ्यांना वर्गीकरणानुसार पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ दिला जाण्याची तरतूद शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे. या योजनांमधून घरकुल मिळत असल्याने कागदांची जुळवाजुळव करून नगरपरिषद मूल येथे सादर करण्यात आली. पक्के घर मिळणार ही आशा निर्माण झाल्याने अनेकांनी मिळालेल्या रकमेतून बांधकामाला सुरुवात केली. पण बांधकाम अर्धेअधिक झाल्यानंतर अनुदान गेल्या एक वर्षापासून मिळत नसल्याने घरकुलाचे बांधकाम थंडबस्त्यात आहे. गेल्या एक वर्षापासून लाभार्थी नगरपरिषदेत चकरा मारत आहेत. मात्र शासनाकडून घरकुलाचा हप्ता वेळेवर मिळत नसल्याने, कुठे घरकुलाचा पाया, तर कुठे भिंती उभ्या करून लाभार्थी हप्त्याची वाट पाहत आहेत. घर पाडून १७ महिन्यांचा कालावधी लोटत आहे. मात्र घर पूर्ण काही होत नसल्याने लाभार्थी चिंताग्रस्त झाला आहे. दुसऱ्याच्या घरी आश्रय घेऊन घर पाडले व कामाला सुरुवात करण्यात आली. पण मोठ्या आशेने घराचे स्वप्न पाहणाऱ्यांचा स्वप्नभंग होताना दिसत आहे. घरकुलाचा पहिला हप्ता मिळणाऱ्यांनी पाया, तर ज्याला दुसरा हप्ता मिळाला त्यांनी भिंती बांधून ठेवल्या आहेत. घरकुले अपूर्ण अवस्थेत आहेत. हे घरकुल लाभार्थी पुढील हप्ता केव्हा मिळणार, याकडे नजरा लावून बसले आहेत. सदर योजना दोन लाख ५० हजार रुपयांची असून काही लाभार्थींना ४० हजार, तर कुणाला ८० हजार मिळाले आहेत. त्यामुळे अजून बरीच रक्कम मिळायची असल्याने घरकुल लाभार्थी हप्ते मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कोट
नगरपरिषद मूलच्यावतीने जानेवारी २०२० ला घरकुल मंजूर करण्यात आले. घर पाडल्यानंतर बांधकामाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी एप्रिल २० ला पहिला हप्ता ४० हजार रुपये व दुसरा हप्ता ऑगस्ट २०२० ला ४० हजार रुपये देण्यात आला. मिळालेल्या रकमेतून पाया व भिंती उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर हप्ते मिळणे बंद असल्याने पावसाळ्यात काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- वसंत गुरुनुले, लाभार्थी, मूल.