पाच हजारांच्या मदतीवर कसे उभारावे घर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 05:00 AM2020-09-14T05:00:00+5:302020-09-14T05:00:20+5:30
सुरुवातीच्या टप्प्यात घरात पाणी शिरल्याने लोकांना खाण्यासाठी काहीच पर्याय नव्हता. तोपर्यंत जेवण, कपडे, आश्रय देणे आवश्यक होते. आता पूर ओसरला असून पूरग्रस्त आपापल्या गावातील आपल्या घरी पोहोचले आहेत. त्यांना दोन तीन महिने पुरेल एवढे धान्य, कपडे, अंथरूण, पांघरूण पुरेसे आहे. अजूनही धान्य कपडयांच्या मदतीचा ओघ सुरूच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : तालुक्यातील अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांसाठी अनेकजण मदतीला धावून आले. त्यात प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक व राजकीय संस्था आदींनी आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करीत पूरग्रस्तांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पण आता खरी गरज आहे ती पडलेल्या घरांच्या उभारणीची. शासनाने पडझड झालेल्या पूरग्रस्तांना पाच हजारांचे वाटप केले असले तरी त्यात घर कसे उभारायचे, असा प्रश्न पूरग्रस्त कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.
त्यामुळेच आता इतर कोणत्याही प्रकारची मदत नाही मिळाली तरी चालेल पण निवारा द्या, अशी आर्त हाक पूरग्रस्त देत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात घरात पाणी शिरल्याने लोकांना खाण्यासाठी काहीच पर्याय नव्हता. तोपर्यंत जेवण, कपडे, आश्रय देणे आवश्यक होते. आता पूर ओसरला असून पूरग्रस्त आपापल्या गावातील आपल्या घरी पोहोचले आहेत. त्यांना दोन तीन महिने पुरेल एवढे धान्य, कपडे, अंथरूण, पांघरूण पुरेसे आहे. अजूनही धान्य कपडयांच्या मदतीचा ओघ सुरूच आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत ज्यांची घरे पुर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना अन्नधान्य, कपडयांच्या गरजेपेक्षा महापुराने उदध्वस्त झालेल्या घरांना पुन्हा उभारण्याची गरज अधिक आहे. हीच त्यांची खरी गरज असून ते आशाळभूतपणे प्रशासनाकडे, शासनाकडे नजरा लावून बसले आहेत. उद्ध्वस्त झालेल्या घराच्या नव्याने बांधणीसाठी त्वरित शासनाकडून निधी उपलब्ध होईल आणि आपल्याला आपल्या डोईवरचा छत उभा करता येईल, या आशेवर तर जगत आहेत.
शासनाकडून तत्काळ पाच हजार रुपयांची मदत मिळाली आहे. आणखी काही रुपये पूरग्रस्तांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. परंतु एवढयाने उद्ध्वस्त झालेली घरे उभी राहणार का, शासनाची पुढील मदत येईपर्यंत आसरा कुठे घ्यायचा, भविष्यात कसे होईल, या विवंचनेत पुरात उदध्वस्त झालेल्या घरांच्या कुटुंब प्रमुख आहेत. अख्खे कुटुंबीय चिंताग्रस्त बनली आहेत. पोटात भूक लागते परंतु उद्याच्या चिंतेने अन्नाचा घास पोटात जात नाही. रात्रभर त्यांना झोपही येत नाही, अशी विचित्र अवस्था त्यांची झाली आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था, उद्योगपतींनी, लोकप्रतिनिधींनी आता निवारे उभे करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
प्रभावित गावांना समान वाटप करणे गरजेचे
विशिष्ट एका गावात फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे म्हणून इतर प्रभावित झालेल्या गावांना वाऱ्यावर सोडून काही विशिष्ट अशा दोन-चार गावातच मदतीचा ओघ सुरू आहे. काही गावात मदतीचा महापुर सुरू आहे.पण महापुराने प्रभावित झालेली तालुक्यातील अशीही काही गावे आहेत, त्या ठिकाणी बºयाच मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतु त्या गावांना आजतागायत कोणीही भेट देऊन त्यांचे सांत्वन केले नाही. फक्त सर्व्हेच्या माध्यमातून शासकीय मदत पोहचली आहे. इतरांचे फारसे लक्ष काही गावांकडे जातांना दिसून येत नाही.
दोन मतदारसंघ विभाजनाचा पूरग्रस्तांना फटका
तालुक्यातील पूरग्रस्त गावे दोन विधानसभा मतदारसंघात विभागली असल्याने लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मदत देताना आपले उद्याचे राजकीय भविष्य लक्षात घेऊन पूरग्रस्तांना मदत देत आहेत. हा पूरग्रस्त आपल्या पक्षाचा नाही म्हणून अशा पूरग्रस्तांना काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डावलले असल्याचे प्रकार तालुक्यात घडले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत मानवीय दृष्टीकोनातून खºया गरजूपर्यंत मदत पोहचणे आवश्यक आहे.