डेंग्यूचे रुग्ण असतानाही चंद्रपूर स्वच्छ कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:50 PM2018-09-21T22:50:44+5:302018-09-21T22:51:49+5:30
शहरातील डेंग्यूचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब असून हे प्रशासनासमोर एक प्रकारचे आव्हान आहे. चंद्रपुरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. याचा अर्थ शहराची साफसफाई व पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही, असे फटकारत डेंग्यूच्या निर्मूलनासाठी महानगराची स्वच्छता व पाण्याचा निचरा, याकडे विशेष लक्ष देवून यंत्रणेमार्फत ही कामे युध्दपातळीवर हाती घ्या, अशा शब्दात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महानगर प्रशासनाला खडसावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील डेंग्यूचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब असून हे प्रशासनासमोर एक प्रकारचे आव्हान आहे. चंद्रपुरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. याचा अर्थ शहराची साफसफाई व पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही, असे फटकारत डेंग्यूच्या निर्मूलनासाठी महानगराची स्वच्छता व पाण्याचा निचरा, याकडे विशेष लक्ष देवून यंत्रणेमार्फत ही कामे युध्दपातळीवर हाती घ्या, अशा शब्दात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महानगर प्रशासनाला खडसावले.
डेंग्यूच्या वाढत्या रूग्णसंख्येसंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. महानगरपालिकेतर्फे २५३ संशयित डेंग्यू रूग्णांचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ४३ नमुने पॉझिटीव्ह आढळून आले तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५५० संशयित डेंग्यू रूग्णांच्या रक्त चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी १२० रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. आजच्या स्थितीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकही रूग्ण भरती नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी दिली.
तरीही चंद्रपूर शहरामध्ये एवढे डेंग्यू रूग्ण असणे ही चांगली बाब नसून याचा अर्थ शहराची साफसफाई व पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही, हे उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर मनपा आयुक्त संजय काकडे सांगितले की शहरातील झोपडपट्टी भागात जास्त डेंग्यू रूग्ण आढळले असून या भागाच्या स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येत आहे.
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अॅपॅडेमिक परिस्थितीमध्ये शहरातील लालपेठ वेकोलि कॉलरी भाग येथील क्षेत्रिय रूग्णालयामध्ये रूग्ण भरती करता येतील काय, याची शक्यता पडताळावी व वेकोलिच्या अधिकाऱ्यांशी अधिष्ठाता व महानगपालिकेचे आयुक्त यांनी संपर्क साधून याबाबत बोलणे करावे, असे सूचविले. याकरिता वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंह यांना या बैठकीत पाचारण करण्यात आले.
खासगी डॉक्टरांनी डेंग्यू रुग्णाबाबत कळवावे
डेंग्यू हा डासांमुळे होणारा आजार विषाणूजन्य व नोटीफायेबल असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयित डेंग्यू रुग्ण आढळल्यास महानगरपालिका हद्दीतील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी व रुग्णालयांनी त्याची माहिती महानगरपालिकेस कळविणे अनिवार्य आहे, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. याबाबत मनपा आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारे खासगी रुग्णालयांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी देऊन, त्यांच्या बैठकी आयोजित करून याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. असे असताना शहरातील अनेक रुग्णालये व डॉक्टरांकडून मनपाला यासंबंधी कळविले जात नाही. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी व रुग्णालयांकडून ‘कार्ड टेस्ट / आरडीटी’ (रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट) सारख्या प्राथमिक चाचणी करून डेंग्यु आजारांचे रुग्ण म्हणून निदान करीत असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. वास्तविक कार्ड टेस्टद्वारे रुग्णाची तपासणी केली असता तो डेंग्यू रुग्ण आहे हे खात्रीने सांगता येत नाही. त्यासाठी एलायझा टेस्ट करणे गरजेचे आहे. कार्ड टेस्ट ही निश्चित डेंग्यूचे निदान करत नसल्याने एलायझा चाचणीव्दारे खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी डेंग्यू आजाराचे निदान करुन घेणे आवश्यक आहे, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.