जगायचे कसे ? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा 25 रुपयांनी महागले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 05:00 AM2021-07-04T05:00:00+5:302021-07-04T05:00:27+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर कमी असतानासुद्धा पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात येत आहे. डिसेंबर २०२० मध्ये सिलिंडरचे दर ६५० रुपयांच्या जवळपास होते. मात्र त्यामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली. आता या सिलिंडरचे दर ८७५ रुपये करण्यात आले. एकीकडे सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ होत असताना सबसीडीमध्ये कपात केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे सर्वांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरसाठी आता ८७५ रुपये मोजावे लागणार आहे. डिसेंबर महिन्यात हे गॅस ६५० रुपयांना मिळत होते. सात महिन्यांच्या कालावधीत त्यामध्ये तब्बल २२५ रुपयांची भाववाढ करण्यात आली आहे. पूर्वीच कोरोनाने आर्थिक बजेट बिघडविले असताना सिलिंडरच्या दरवाढीने पुन्हा बजेट बिघडविले आहे. त्यामुळे महिलांना मोठी दमछाक होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर कमी असतानासुद्धा पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात येत आहे. डिसेंबर २०२० मध्ये सिलिंडरचे दर ६५० रुपयांच्या जवळपास होते. मात्र त्यामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली. आता या सिलिंडरचे दर ८७५ रुपये करण्यात आले. एकीकडे सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ होत असताना सबसीडीमध्ये कपात केली जात आहे.
ग्राहकांना केवळ ३० ते ४० रुपये सबसिडी देण्यात येत आहे. मागील वर्षीपासून कोरोनामुळे लॉकडाऊन असताना सर्वजण आर्थिक संकटात आहेत. त्यातच घरगुती गॅसच्या दरामध्ये वाढ करण्यात येत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
सात महिन्यात २२५ रुपयांची वाढ
डिसेंबर महिन्यात गॅस सिलिंडरचे दर ६५० रुपयांच्या जवळपास होते. मागील सात महिन्यांच्या कालावधीत त्यामध्ये तब्बल २२५ रुपयांची भाववाढ करण्यात आली आहे. आता सिलिंडरचे दर ८७५ रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे. सततच्या दरवाढीने गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडले आहे.
पुन्हा पेटल्या चुली
कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. काम मिळणे बंद झाले आहे. तर अनेकजण बरोजगार झाले आहेत. यातच घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला आता सर्रास चुलीकडे वळताना दिसून येत आहेत. याऊलट गॅसवर मिळणाऱ्या सबसिडीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात येत आहे. त्यामुळे सिलिंडरसाठी रक्कम आणायची कोठून असा प्रश्न ग्रामीण महिलांना पडत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या सावटात अनेक महिला जंगलामध्ये सरपण गोळा करायला जात आहेत. धूरमूक्त गाव करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी उज्ज्वला गॅस योजना सुरु करण्यात आली होती. या लाभार्थ्यांना पूर्वी बऱ्यापैकी सबसिडी देण्यात येत होती. मात्र आता त्यामध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पून्हा चूल पेटत असल्याचे दिसून येत आहे.
घर खर्च भागवायचा कसा
कोरोनामुळे आर्थिक अडचण आहे. कामसुद्धा बंदी आहे. त्यामुळे दोन वेळेची भ्रांत कशी काढावी, असा प्रश्न आहेत. त्यातच शासनाकडून सिलिंडरच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न आहे.
- रंजू गोवरदीपे, गृहिणी
खाद्य तेल, दाळ आदी जीवनावश्यक किंमतीच्या दरात वाढ करण्यात आली होती. आता गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे किचनचा बजेट बसवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
प्रतिमा कोडापे, गृहिणी