कासवगतीची शिक्षा अजून किती दिवस?
By Admin | Published: January 10, 2015 10:51 PM2015-01-10T22:51:16+5:302015-01-10T22:51:16+5:30
दुर्गापूर-ताडोबा मार्गावर क्रॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम दोन वर्षानंतरही पूर्ण झाले नाही. परिणामी या मार्गावर वारंवार अपघात घडत आहे. याला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध
दुर्गापूर : दुर्गापूर-ताडोबा मार्गावर क्रॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम दोन वर्षानंतरही पूर्ण झाले नाही. परिणामी या मार्गावर वारंवार अपघात घडत आहे. याला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाची दखल घेण्यात न आल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या रस्ता बांधकामाचे कंत्राट चंद्रपूर येथील गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. हे काम जानेवारी २०१४ पर्यंत करण्याची अट होती. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटूनही अद्याप काम अर्धवट आहे. त्यामुळे येत्या एक वर्षात हे काम होण्याची शक्यता नाही. कंत्राटदारातर्फे करण्यात येणाऱ्या कामाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
हा राज्य महामार्ग असून ताडोबा राष्ट्रीय उद्यानाकडे जाणार आहे. याच परिसरात कोळसा खाण असल्याने या मार्गावरून कोळसा वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांचे सातत्याने आवागमन सुरू असते. कंत्राटदारामार्फत एका बाजुने करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने दुसऱ्या बाजुला असलेल्या खड्डयांच्या रस्त्यातून वाहने न्यावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर दुचाकी वाहनांना अपघात होऊन त्यात अनेकजण जखमी झाले आहेत. १५ दिवसांपूर्वी दुर्गापूर येथील एका आयुर्वेदिक डॉक्टरचा दुचाकी अपघातात याच मार्गावर मृत्यू झाला. या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कंत्राटदार जबाबदार असून त्यांच्यावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नितीन भटारकर यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अमोल ठाकरे, संजय ठाकूर, सुजित उपरे, मोनू गिरधर, नितीन रत्नपारखी, राहुल भगत, बिट्टू ढोरके, आशु मत्ते, संजय रायपुरे, अमित मेश्राम, पवन मेश्राम, प्रफुल्ल कुचनकर, अविनाश जेनेकर, शैलेंद्र बेलसरे, विक्की बावणे यांनी दिला आहे. (वार्ताहर)