नरभक्षक वाघ आणखी किती बळी घेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:05 PM2018-06-18T23:05:46+5:302018-06-18T23:06:36+5:30
तालुक्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मागील पाच महिन्यांपासून वाघाची दहशत कायम आहे. पाच महिन्यांत दोन महिला व दोन पुरुषांचा बळी गेला. एक इसम गंभीर जखमी झाला आहे. पण, वन विभागाने या वाघाचा अद्याप बंदोबस्त केला नाही. त्यामुळे नरभक्षक वाघ आणखी किती व्यक्तींचा बळी घेणार, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : तालुक्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मागील पाच महिन्यांपासून वाघाची दहशत कायम आहे. पाच महिन्यांत दोन महिला व दोन पुरुषांचा बळी गेला. एक इसम गंभीर जखमी झाला आहे. पण, वन विभागाने या वाघाचा अद्याप बंदोबस्त केला नाही. त्यामुळे नरभक्षक वाघ आणखी किती व्यक्तींचा बळी घेणार, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
तयागोंदी शेतावर काम करीत असताना सिंदेवाही येथील कमला निकोडे, मुरमाडी येथील गिता पेंदाम, मुकुंदा भेनडारे रा. किन्ही, महादेव गेडाम रा. मुरमाडी व लाडबोरी येथील वनीता चौके यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. तर किन्ही येथील पुजाजी भेंडारे गंभीर जखमी केले. तेव्हापासून परिसरात वाघाची दहशत कायम आहे. दहशतीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले होते. परंतु हंगाम सुरू असल्याने दहशतीतच कामे सुरू केली आहेत. तालुक्यातील बरीच गावे व शिवार जंगलाला लागून आहे. त्यामुळे जंगलाशी शेतकºयांचा जवळचा संबंध आहेत. जंगलातील वाघ व बिबट जंगल सोडून गावाशेजारी का येतो, हा संशोधनाचा विषय आहे. पूर्वी जंगल फार दाट स्वरूपाचे होते. जंगलात कुकडरांजी व झिलबुलीची झाडे मोठ्या प्रमाणात होती. १५ वर्षांपूर्वी निस्तार हक्काअंतर्गत लाकूड तोडण्याची परवानगी होती. त्यामुळे कुकडरांजीची झाडे तोडण्यात आली. या झाडांमध्ये वाघ व बिबटाचा अधिवास होता. टेकडीवर तर वाघाचे नैसर्गिक निवासस्थान राहायचे. पूर्वी जंगलतोड नसल्यामुळे जंगलात वन्यप्राणी मुक्तपणे संचार करीत होती. वाघाला नैसर्गिक खाद्य मिळत होते. त्यामुळे वाघ गावाशेजारी फिरकत नव्हता. आता जंगलातील रानडुक्कर, हरिण, चितळ, सांबर, ससे आणि अन्य तृणभक्षी वन्यप्राणी दिसेनासे झाले आहेत. वन्य प्राण्यांची अवैध शिकार होत असल्यामुळे तृणभक्षक प्राणी कमी झाले. मांसभक्षक प्राणी गावाच्या दिशेने येवून मानवावर हल्ला करीत आहेत. याशिवाय जळावू बीट व इमारती लाकडाच्या नावाखाली वन विभाग व वन विकास महामंडळाकडून शेकडो हेक्टर जमिनीवरील झाडांची कटाई केली जात आहे. त्यामुळे वाघ व बिबटाची नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत.
ग्रामीण भागातील वनाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होत आहे. तर वाघ व बिबट यांना नैसर्गिक खाद्य मिळत नसल्यामुळे गावाजवळ येवून मानवांवर हल्ले करुन ठार करीत आहे. गावाजवळ येवून गाय, म्हैस, शेळी व बकरे यांचे लचके तोडत आहेत. परिसरातील जंगलात वणवा लागल्यामुळे वन्यप्राणी व तृणभक्षक प्राण्यांची वाताहात होत आहे. त्यांचा अधिवास संपत आहे. त्यामुळे मानव व वन्यजीव संघर्षाच्या घटना तालुक्यात वाढल्याचे दिसून येत आहे. इंधनाची गरज भागविण्यासाठी काही नागरिक अवैध वृक्षतोड करीत आहेत. हा प्रकारही योग्य नाही. मात्र, वन विभागाने यावर तोडगा काढण्याची गरज आहे.
जंगलावरील निर्भरता कमी करण्यासाठी हव्या योजना
वनग्रामातील महिलांना सरपण आणावे लागते. उन्हाळ्यात तेंदूपाने गोळा करण्याकरिता जंगलात जावे लागते. दरम्यान, वाघाला मानव दृष्टीस पडल्यास किंवा त्याला काही स्पर्श झाल्यास हल्ला करतो. दरवर्षी सिंदेवाही तालुक्यात पाच ते दहा व्यक्तींचा वाघाच्या हल्ल्यात बळी जात आहे. वन्यप्राणी व जंगलाचे संगोपन करणे ही काळाची गरज असली तरी वाघाचे हल्ले कसे बंद होतील, याचाही विचार वन विभागाने केला पाहिजे. पण, वनाचे संरक्षण करण्याचे काम या क्षेत्रात होत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. वनाच्या हद्दीवर संरक्षक भिंत अथवा तारेचे कुंपण लावावे. तसेच नागरिकांची जंगलावरील निर्भरता कमी करावी, अशी मागणी केली जात आहे.