४३६ रुपयांत किती जणांना मिळाला दोन लाखांचा विमा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 02:59 PM2024-07-02T14:59:33+5:302024-07-02T15:00:09+5:30
वारसाच्या खात्यात थेट मिळतो लाभ : दरवर्षी करावे लागते नूतनीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. जीवन ज्योती ४३६ तर सुरक्षा विमा केवळ २० रुपयांत काढला जातो. मृताच्या वारसाला दोन लाखांचा लाभ थेट त्याच्या बँक खात्यात जमा केला आतो. कुटुंबातील सदस्याने काढलेल्या विम्याचा लाभ वारसांना मिळाला आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नाही. विमा काढल्यानंतर प्रत्येक वर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते. विमा कव्हरच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला लाभ दिला जातो. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासले जात आहे.
काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ४३६ रुपयांत काढला जातो. विमाधारक व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला तरी वारसाला दोन लाख रुपयांचा लाभ होतो.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा केवळ २० रुपयांत काढला जातो. विमाधारकाचा सर्पदंशाने अथवा अपघाती मृत्यू आल्यास शवविच्छेदन अहवाल, पोलिस दप्तरी नोंद आवश्यक आहे.
विमा योजनेचा लाभ घ्या
पंतप्रधान जीवन ज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा या दोन्ही योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या आहेत. या योजनेतून थेट मृताच्या लाभार्थ्यांच्या वारसाला लाभ मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने या योजनेद्वारे विमा उतरून संरक्षण कवच घ्यावे, असे आवाहन अग्रणी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.
'जीवन ज्योती'चे खातेदार लाखांवर
जिल्ह्यात पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना काढणाऱ्या खातेदारांची संख्या लाखांवर आहे. त्यासाठी ४३६ रुपये भरावे लागतात.
अद्यापही अनेकजण विम्याचा लाभ घेण्याकडे कानाडोळा करताना दिसून येतात.
'सुरक्षा विमा'चे तीन लाख खातेदार
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे जिल्ह्यात तब्बल तीन लाखांवर खातेदार आहेत. केवळ २० रुपयांत विमा निघत असल्याने नागरिक हा विमा काढण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात.