पोळ्याला बैलांची पूजा कशी करायची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:32 AM2021-09-06T04:32:09+5:302021-09-06T04:32:09+5:30
वसंत खेडेकर बल्लारपूर : पोळ्याच्या दिवशी पोळा फुटल्यानंतर दारी आलेल्या बैलजोडीची पूजा करून त्यांना गोडधोड खायला देण्याची तसेच बैलजोडी ...
वसंत खेडेकर
बल्लारपूर : पोळ्याच्या दिवशी पोळा फुटल्यानंतर दारी आलेल्या बैलजोडीची पूजा करून त्यांना गोडधोड खायला देण्याची तसेच बैलजोडी मालकाला भोजारा देण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. गृहिणी बैलजोडीची पूजा मनोभावे मोठ्या श्रद्धेने करतात. मात्र, दिवसेंदिवस बैलांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळे पोळ्याला बैलजोडीची पूजा कशी करायची, हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून श्रद्धाळू गृहिणींपुढे उभा होत आहे.
पूजेचे ताट हातात घेऊन बैलजोडीची वाट बघत दारावर गृहिणी उभ्या होतात. खूप प्रतीक्षेनंतर एखादी बैलजोडी आली तर नशीब! अन्यथा, पोळ्यानिमित्त घरातील देव्हाऱ्यात बसलेल्या मातीच्या बैलांची पूजा करून समाधान करावे लागते. ही स्थिती गेले अनेक वर्षांपासून खेडे, गाव व शहरातील आहे. २५-३० वर्षांपूर्वी स्थिती वेगळी होती. लहान मोठ्या शेतकऱ्यांकडे हमखास स्वतःची बैलजोडी असायची. पोळ्याला बैलजोडीला सजवून पोळा भरण्याच्या ठिकाणी आणले जाई व पोळा फुटल्यानंतर बैलजोडीला घरोघरी पूजेकरिता नेले जाई. (आताही तीच प्रथा). मात्र, शेतीच्या कामांत ट्रॅक्टर इत्यादी आधुनिक यंत्राचा शिरकाव झाल्यानंतर बैलजोडीचे महत्त्व कमी होत होत आता काही गावांत ती बोटावर मोजण्याइतकी झाली आहे. त्याचा परिणाम अर्थात बैलांचा व कास्तकारांचा जिव्हाळ्याचा सण पोळा यावर झालेला आहे. पूर्वी पोळ्याला बैलांची लांब रांग लागायची.
बॉक्स
शेतकामात यंत्रे वाढली
हल्ली आधुनिक यंत्राद्वारेच शेतीची कामे होत असल्याने आता बैलांची फारशी गरज लागत नाही. सोबतच, चाऱ्यांचे भाव वाढले आहे. पूर्वी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाई. त्यातून बैलांना खाण्याकरिता कडबा मिळायचा. आता, ज्वारीचा पेरा जवळपास बंद झाला आहे. बैलांची संख्या कमी होण्याला हे व इतरही काही कारणे आहेत.