आमदार जोरगेवारांकडून मुख्यमंत्र्यांचे तोंड गोड; तिळगूळ देत म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 12:38 PM2023-01-20T12:38:35+5:302023-01-20T13:05:44+5:30
दावोस परिषदेत महाराष्ट्राची भरारी
चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथे दौऱ्यावर गेले होते. दरम्यान, स्वित्झर्लंड येथील दावोस येथे आयोजित 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये विविध उद्योजकांसमवेत चंद्रपूरसाठी २० हजार ६०० कोटी रुपयांचे दोन मोठे प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार केला. बेरोजगार युवकांसाठी रोजगारनिर्मिती आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले. यानिमित्त चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गुंतवणूकीबाबाबत शुभेच्छा दिल्या व संक्रांतीच्या निमित्ताने तिळगूळ देऊन तोंड गोड केले.
स्वित्झर्लंड येथील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राशी सुमारे ८८ हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. यामध्ये विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठीच जवळपास २२ हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे. या गुंतवणुकीमुळे विदर्भासह राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मीती होऊन अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे मुंबईत परतल्यानंतर आमदार जोरगेवारांनी त्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना तिळगूळ देऊन - गोड गोड बोला, असे म्हणत या उद्योगांसह रिफायनरी प्रकल्पसुद्धा चंद्रपूरला द्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्राच्याच
झालेले करार -
- पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रूखी फूडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प.
- औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प, ६,३०० जणांना रोजगार मिळेल.
- बर्कशायर-हाथवेबरोबर १६ हजार कोटींचा गुंतवणूक करार. नागरी विकासाला चालना मिळेल.
- पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशनचा १,६५० कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प. यामुळे महाराष्ट्रातील औषध निर्मिती क्षेत्राला चालना मिळणार असून, यातून २ हजार रोजगार निर्मिती होईल.
- मुंबई येथे इंडस् कॅपिटल पार्टनर्स यांचा १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प येणार असून, आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सेवा देता येऊ शकतील.
- बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीस करार.
- अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटींचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प
- ब्रिटनच्या वरद फेरो ॲलाँईजचा गडचिरोलीतील चार्मोशी येथे १,५२० कोटींचा स्टील प्रकल्प
- इस्रायलच्या राजुरी स्टील्स ॲण्ड अलॉईजचा चंद्रपूरमधील मूल येथे ६०० कोटींचा स्टील प्रकल्प
- पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट ॲटो सिस्टीम्सचा पिंपरी येथे ४०० कोटींचा प्लास्टिक ॲटोमोटीव्हज् प्रकल्प तसेच गोगोरो इंजिनिअरिंग व बडवे इंजिनिअरिंगचा २० हजार कोटींचा ऑटो प्रकल्प.