मानवी कल्याण हेच बौद्ध तत्त्वज्ञानाचे मूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:18 PM2018-10-16T22:18:27+5:302018-10-16T22:19:07+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य उपेक्षित जनतेला विकासाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे जगभरातील अभ्यासक बुद्धविचारांकडे आकर्षित झाले आहेत. मानवी कल्याण हेच बौद्ध तत्त्वज्ञानाचे मूळ आहे, असा सूर ६१ व्या धम्मचक्र अनुप्रर्वतन सोहळ्यातील धम्मप्रवचन प्रवचन सत्रात उमटला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य उपेक्षित जनतेला विकासाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे जगभरातील अभ्यासक बुद्धविचारांकडे आकर्षित झाले आहेत. मानवी कल्याण हेच बौद्ध तत्त्वज्ञानाचे मूळ आहे, असा सूर ६१ व्या धम्मचक्र अनुप्रर्वतन सोहळ्यातील धम्मप्रवचन प्रवचन सत्रात उमटला.
यावेळी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी बौद्ध बौद्ध तत्त्वज्ञानाची प्रासंगिकता मांडली. बुद्धाला आशिया खंडाचा दीप म्हणून जगभरात ओळख आहे. दैववादी संकल्पनांची चिकित्सा करून त्यातील अनिष्टता अत्यंत सोप्या भाषेत विषद केली. सम्यक विचारच मानवी जीवनातील समस्या दूर करू शकते. दैवीशक्तीने जीवनाचा उत्कर्ष होत नाही, हा वैज्ञानिक विचार जगभरात पोहोचला. धम्म विचारातील शुद्धता टिकविण्यासाठी चुकीच्या विचारांचा प्रतिकार करणारी पिढी तयार होणे गरजेचे आहे, असे मत भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी व्यक्त केले. धम्म चळवळ आणि मानवता, विज्ञान व बौद्ध तत्त्वज्ञान, भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी पैलुंवर मान्यवरांनी अभ्यासपूर्ण मते मांडली. सर्वसामान्य व्यक्तिला बौद्ध तत्त्वज्ञान समजावून सांगण्यासाठी युवापिढीने वाचन व चिंतन केले पाहिजे, याकडेही उपस्थितांनी लक्ष वेधले.
बुद्ध तत्त्वज्ञान आणि आचरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरामागील ऐतिहासिकता या विषयांवर दिवसभरात प्रबोधनसत्र घेण्यात आल होते. प्रारंभी अरुण घोटेकर यांनी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. सामूहिक बुद्ध वंदनेनंतर धम्मप्रवचन सत्राचा समारोप झाला. डॉ. आंबेडकरांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या दीक्षाभूमीवर जिल्ह्यातूनच नाहीतर विदर्भातील असंख्य बौद्ध बांधव डॉ. आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी दीक्षाभूमीवर उपस्थित होते. त्यामुळे पवित्र स्थळावर कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात पोलिसांचा ताफा दीक्षाभूमीवर सज्ज होता. यामध्ये सात पोलीस निरिक्षक, ५० सहाय्यक पोलीस निरिक्षक यांच्यासमवेत ४५० महिला व पुरुष पोलीस शिपाई दीक्षाभूमी परिसरात कर्तव्यावर होते.
दीक्षाभूमीवर धम्म संदेशाचे जत्थे
मैत्री व करुणेचा धम्मसंदेश देण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो तरूणांचे जत्थे दिवसभर दीक्षाभूमीवर येत होते. प्रबोधनाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करणाऱ्या युवक-युवतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर पथनाट्यही सादर केले. दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाºया बौद्धबांधवांना अडचणी येऊ नये, याकरिता स्वयंसेवकांकडून मदत केल्या जात होती.
बुद्ध-भीम गीतांचे तरूणाईला वेड
दीक्षाभूमी परिसरात बुद्ध-भीम गीतांमधून जनजागृती करण्यात आली. वामनदादा कर्डक, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या विद्रोही गीतांनी आंबेडकरी अनुयायांच्या मनात परिवर्तनाची ज्योत पेटविण्याचे काम कलावंतांनी दिवसभर केले. कव्वाल साहेबराव येरेकर यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कव्वाली सादर केली. अन्य कलावंतांनी दमदार गायकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मान्यवर गायक व कलावंतांच्या ध्वनीफित विक्रीलाही दीक्षाभूमीवर उधाण आले होते.
जिल्हा परिषदकडून जनजागृती
जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सामाजिक व सेवाभावी संस्थांकडून आरोग्य तपासणीकरिता स्टॉल लावण्यात आले होते. याशिवाय कृषी, समाजकल्याण विभागाकडून शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत होती. संबंधित कर्मचाºयांकडून नागरिकांना जागृती पत्रके वितरण करण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने दीक्षाभूमी परिसरात प्रथमोपचार केंद्राचा स्टॉल लावण्यात आला होता. रोजगार वाटांची माहिती मिळावी, याकरिता बानाई व कर्मचारी संघटनांनी मार्गदर्शन केंद्र सुरू केले. या केंद्रांमधून युवक-युवतींनी रोजगार संधीची माहिती देण्यात आली. दोन दिवसांमध्ये सुमारे हजारो युवकांनी तज्ज्ञांनाकडून मार्गदर्शन घेतले.