बाभळीमुळे मानव-वन्यजीव संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:40 PM2018-09-28T22:40:10+5:302018-09-28T22:40:37+5:30
शहरी भागात ठिकठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे जंगल वन्यप्राणी-मानव संघर्षाला कारणीभूत ठरत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिचे क्षेत्र तसेच अन्य उद्योगाचे क्षेत्र आणि लगतची गावे याठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे कुत्रिम जंगल नष्ट करून इतर प्रजातीच्या वृक्षाची लागवड करण्याची मागणी इको-प्रोने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरी भागात ठिकठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे जंगल वन्यप्राणी-मानव संघर्षाला कारणीभूत ठरत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिचे क्षेत्र तसेच अन्य उद्योगाचे क्षेत्र आणि लगतची गावे याठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे कुत्रिम जंगल नष्ट करून इतर प्रजातीच्या वृक्षाची लागवड करण्याची मागणी इको-प्रोने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
यावेळी वनमंत्री यांच्यासोबत झालेल्या चर्चेत उर्जानगर परिसरातील वाघ समस्या आणि त्यावरील उपायाबाबत कार्यवाही करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक यांना पत्र देण्यात आलेले आहे. उर्जानगर परिसरात बिबट, अस्वल यासोबत आता वाघांचे दर्शन सामान्य नागरिकांना येता-जाता होऊ लागले आहे. यामुळे या परिसरासह लगतच्या गावात मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होत आहे. मागील दोन वर्षात अनेक अस्वल वीज केंद्र आणि वेकोलिच्या वसाहतीमधून वनविभागाने पकडून इतरत्र हलविले आहे. मात्र समस्या आजही कायमच आहे, कारण मूळ समस्येवर उपाययोजना होताना दिसत नाहीे. मागील एक वर्षांपासून चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र व लगतच्या गावातील शिवारात वाघिणीने पिल्लांसह बस्तान मांडले आहे. नुकतेच नवजात पिल्लांसह पुन्हा दुसऱ्या वाघिणीचे दर्शन येथील नागरिकांना झालेले आहे, तसे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले होते. एकंदरीत सदर कुत्रीम जंगल हे आता वाघासारख्या प्राण्यांचे प्रजनन केंद्र होत चालले आहे. ही चंद्रपूर शहराकरिता मोठी धोक्याची घंटा आहे. याचा प्रत्यय मागील काही महिन्यांपासून सातत्याने येत आहे.
मागील अनेक वर्षांपासून या परिसरांमध्ये काटेरी बाभूळ म्हणजे प्रोसोपिस या प्रजातीच्या वनस्पतीचे कृत्रिम जंगल तयार झालेले आहे. दाटी-वाटीने वाढणाºया या वनस्पतीमुळे जंगलसदृश्य स्थिती निर्माण होते. या परिसरात मोकाट जनावरांची संख्यासुध्दा मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे वन्यप्राणी यांना योग्य लपण, खाद्य व पाणी या ठिकाणी मिळते. पूर्वी बिबट आणि अस्वल यांचे वास्तव्य असलेले हे कुत्रिम जंगल वाघांनासुध्दा आकर्षित करू लागल्याचे निवेदनात म्हटले आहे.