विनोदातच आहे मानवी जीवनाचे खरे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:53 PM2019-03-17T22:53:48+5:302019-03-17T22:54:11+5:30
मानवाच्या जीवनात तीन सत्य आहेत. त्यातील एक सत्य म्हणजे दु:ख आणि या दु:खाचे निवारण करण्याचे उपाय तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहे. तरी ज्या नागरिकांना याची कल्पना नाही, अशा रसिकांच्या जीवनातील दु:ख काही प्रमाणात कमी करीत विनोदाच्या माध्यमातून काही काळासाठी हसविण्याचे काम हा विनोद करतो.
राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : मानवाच्या जीवनात तीन सत्य आहेत. त्यातील एक सत्य म्हणजे दु:ख आणि या दु:खाचे निवारण करण्याचे उपाय तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहे. तरी ज्या नागरिकांना याची कल्पना नाही, अशा रसिकांच्या जीवनातील दु:ख काही प्रमाणात कमी करीत विनोदाच्या माध्यमातून काही काळासाठी हसविण्याचे काम हा विनोद करतो. त्यामुळे विनोद हा सर्व दु:खावर मात करण्याचे साधन आहे. तसेच या विनोदातच जीवनाचे खरे दर्शन आहे, असे मत झाडीपट्टीतील पाच हजार नाटकात व दोन मराठी चित्रपटात भूमिका साकारणारे विनोदी कलावंत के. आत्माराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले
रविवारी चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी येथे आयोजित पहिल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात परिसंवादासाठी के. आत्माराम आले होते. यावेळी लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.
चाळीस वर्षांची कला सांभाळताना अनेक अडचणींना तोंड देण्याचा प्रसंगही के. आत्माराम यांनी उलगडला. शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन परिवारात कलेचा कुठलाही लवशेष नव्हता. मात्र प्राथमिक शिक्षण घेत असतानाच वयाच्या नवव्या वर्षी प्रथम हवालदाराची भूमिका साकारली आणि यातूनच कलेची आवड निर्माण झाली. याच दरम्यान नागभीड व ब्रह्मपुरी येथे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत मिंडाळा येथील संत हरिदास विद्यालयात शिक्षकाची नोकरी स्वीकारली. यासोबतच माझ्यातील कलावंतांच्या जीवनाचाही प्रवास सुरु झाला, असेही के. आत्माराम यांनी सांगितले.
एक एक करीत आतापर्यंत तब्बल ४० वर्ष हजारो झाडीपट्टीतील नाटकात आपण काम केले आहे. आताही करीत आहे. यासोबतच ‘पहिलं पाऊल जीवनाचं’ व ‘लाल चुडा’ या दोन मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत.
दोन मालिका, तसेच सात नाटकाचे लेखन करीत आज वयाच्या ५८ व्या वर्षीही भूमिका करणे सुरूच आहे, असे त्यांनी सांगितले.
नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यामुळे आता नवकलावंतासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करून ही कला नवीन कलावंतांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचे सांगून या कलेतून अनेक रसिकांचे दु:ख या विनोदाच्या भूमिकेतून कमी करण्याचा आपला नेहमी प्रयत्न राहिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देविदासची भूमिका सर्वाधिक आवडती
माझ्यातील कलावंत जिवंत ठेवण्यासाठी माझी अर्धांगिनी कांचन हिचाही मोठा वाटा असल्याचे ते आवर्जुन सांगतात. माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत आबासाहेब आचरेकर लिखित ‘झाकून किती झाकायचं’ या नाटकातील देविदास ही भूमिका आवडल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या क्षेत्रात येणाऱ्या नवीन कलाकारांना संदेश देताना प्रत्येक कलाकारांनी मनापासून मेहनत करावी. कलावंत कधीच रिटायर होत नाही, असेही के.आत्माराम म्हणाले.