रायल्टीच्या नावाने शेकडो ब्रास रेती उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:51 AM2021-02-06T04:51:26+5:302021-02-06T04:51:26+5:30
घुग्घुस परिसरातील वर्धा नदीच्या चिंचोली घाटानजीक महसूल विभागाने ४ जून २०२० रोजी ४६३ ब्रास रेती स्टॅक पकडला होता. मात्र ...
घुग्घुस परिसरातील वर्धा नदीच्या चिंचोली घाटानजीक महसूल विभागाने ४ जून २०२० रोजी ४६३ ब्रास रेती स्टॅक पकडला होता. मात्र त्या स्टॅकपैकी ३०० ब्रास रेती चोरीला गेल्याची तक्रार घुग्घुस पोलीस ठाण्यात तहसीलदार यांनी नोंदविली होती. सात महिन्यांनंतर उर्वरित रेतीचा लिलाव करून महसूल विभागाने लिलावधारकाला राॅयल्टी उपलब्ध करून दिली. तो स्टॅाक लिलावधारक केवळ दोन दिवसँत उचलू शकतो. मात्र महसूल विभागाने २ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारीपर्यंत उचलण्याची परवानगी दिली. २ फेब्रुवारीला राॅयल्टी मिळताच चिंचोली घाटावरील रेतीची चोरी होऊ नये म्हणून ‘जेसीबी’ने खोदलेली नाली बुजविण्यात आली असून, रस्ता बनवून काही वाहनधारकांकडून दिवसरात्र ट्रॅक्टरऐवजी आता हायवाने रेती उपसा जोरात सुरू आहे. सध्या रॉयल्टीच्या नावाखाली लाखो रुपयांच्या रेतीची चोरी होत आहे. निवडणुकीनंतर परत १६ फेब्रुवारीपर्यंत रेती तस्करांना सुगीचे दिवस आल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. आजही या भागात ठिकठिकाणी शेकडो ब्रास रेतीचे ढिगारे दिसून येतात.
वर्धा नदीच्या हल्ल्या घाटावर १४ जानेवारीला पहाटे उपविभागीय आधिकाऱ्यांनी रेती उत्खनन करताना रंगेहात पकडून २४ ट्रॅक्टरवर कारवाई केल्यानंतर रेती तस्करांवर वचक बसेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र त्यापेक्षा अधिक जोमाने ट्रॅक्टरने रेती तस्करी सुरू आहे. हल्ल्या घाटावर मोठ्या प्रमाणावर रेती उपलब्ध असल्याने रेती तस्करांनी आपला मोर्चा तिकडे वळविला असताना आता चिंचोली घाटसुद्धा रेती उपसा करून रिकामा केला जात आहे.