घरांच्या पडझडीमुळे दीड कोटींचे नुकसान
By admin | Published: July 14, 2016 12:50 AM2016-07-14T00:50:48+5:302016-07-14T00:50:48+5:30
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या चंद्रपूर जिल्हावासीयांना गेल्या पाच दिवसात पावसाने चांगलेच झोडपून काढले.
जिल्ह्यात १ हजार ११ घरांची पडझड : २६३ जण मदतीसाठी पात्र
चंद्रपूर : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या चंद्रपूर जिल्हावासीयांना गेल्या पाच दिवसात पावसाने चांगलेच झोडपून काढले. शुक्रवार ते मंगळवार या पाच दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात ११ जुलैपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ११ घरांची पडझड झाली असून जवळपास दीड ते दोन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
गेल्या पाच दिवसांत रेकॉर्ड ब्रेक पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला. नैसर्गीक पाणी तसेच पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरले. त्यामुळे १ हजार ११ कच्च्या व पक्या घरांची पडझड झाली आहे. यातील काही पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्यात आले असून कच्च्या घरांमध्ये २५६ जण तर पक्क्या घरांमध्ये ७ जण मदतीसाठी पात्र ठरले आहेत. ही माहिती ११ जुलै पर्यंतची असून पडझड झालेल्या घरांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे जिल्ह्याधिकारी कार्यालयाने सांगितले.
राज्यातील काही भागात जून महिन्यात पावसाला सुरूवात झाली. मात्र चंद्रपूर जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षाच होती. पाऊस लांबल्याने पेरणीची कामेही लांबणीवर गेली. जुलै महिन्यात सुरूवातीला काही भागात पाऊस झाला तर काही भागातील नागरिकांना पावसाची प्रतीक्षाच होती. मात्र मात्र ८ जुलैपासून सतत पाच दिवस जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. त्यामुळे पूर परिस्थीती व घरांच्या पडझडीने शेतकरी व प्रशासनाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. पाच दिवसांच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर सिंचन प्रकल्पही पूर्ण भरण्याच्या स्थितीत आहेत.
(स्थानिक प्रतिनिधी)
सावली तालुक्याला सर्वाधिक फटका
घरांची सर्वाधिक पडझड सावली तालुक्यात झाली असून या तालुक्यात १२५ जणांचे कच्चे व ६ जणांचे पक्के घर कोसळले आहेत. त्या पाठोपाठ नागभीड तालुक्यात १२५ कच्चे घर व २ पक्के घर पडली. वरोरा तालुक्यात ११४ तर राजुरा १०६, गोंडपिंपरी १०७, चिमूर तालुक्यात ६९ घरांची पडझड झाली आहे. तसेच जिल्हाभरात गुरांच्या १५ गोठ्यांचीही पडझड झाली आहे.
सहा जण पुरात वाहून गेले
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथळी भरून वाहत असून काही नदी व नाल्यांना पूर आला. या पुरात जिल्ह्यातील सहा जण वाहून गेले आहेत. यात चंद्रपूर तालुक्यात दोन जण, बल्लारपूर तालुक्यात चार जण तर ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज येथेही दोन जण वाहून गेले. मात्र अद्याप त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
सहा जणांचा नैसर्गिक मृत्यू
पावसामुळे सहा जणांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. तर जनावरे मृत्यूमुखी पडल्याची घटना भद्रावती तालुक्यात घडली असून नैसर्गिक मृत्यूने एक जनावर येथे दगावला आहे.