दिवाळीच्या तोंडावर डिझेलची शंभरी; गहू, तांदळासह तूप, तेल महागणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 05:00 AM2021-10-11T05:00:00+5:302021-10-11T05:00:33+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील ७० टक्के कृषी व्यवस्थेवर निर्भर आहे. अस्मानी व सुलतानी संकटांनी आधीच त्रस्त असणारा बहुसंख्य वर्ग दरवर्षी आपल्या आर्थिक शक्तीनुसार दिवाळी सण साजरा करतो. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. उत्पादन निघाल्यानंतर बाजारात काय स्थिती राहिल, हे अद्याप सांगता येत नाही. लवकरच दिवाळी येणार आहे. मात्र, डिझेलचे दर प्रति लिटर ९९.१३ पर्यंत पोहोचले. याचा परिणाम देशांतर्गत मालवाहतुकीवर झाला. चंद्रपुरातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार मालवाहतुकीच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र सरकारच्या धोरणामुळे डिझेलच्या दरात वाढली. परिणामी, मालवाहतुकीचे दरही चढे झाल्याने यंदा ऐन दिवाळीच्या तोंडावरच गहू, तांदळासह, तूप व तेल महाग होऊ शकते. कोरोना संकटापासून सावरणे सुरू असताना हे नवेच संकट निर्माण झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील ७० टक्के कृषी व्यवस्थेवर निर्भर आहे. अस्मानी व सुलतानी संकटांनी आधीच त्रस्त असणारा बहुसंख्य वर्ग दरवर्षी आपल्या आर्थिक शक्तीनुसार दिवाळी सण साजरा करतो. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. उत्पादन निघाल्यानंतर बाजारात काय स्थिती राहिल, हे अद्याप सांगता येत नाही. लवकरच दिवाळी येणार आहे. मात्र, डिझेलचे दर प्रति लिटर ९९.१३ पर्यंत पोहोचले. याचा परिणाम देशांतर्गत मालवाहतुकीवर झाला. चंद्रपुरातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार मालवाहतुकीच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली. याचा अनिष्ट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे. डिझेल व पेट्रोल दरवाढीमुळे गहू, तांदूळ, डाळी, तेल, तूप, शेंगदाणा व अन्य तेलजन्य पदार्थांच्या किमती पुन्हा वाढणार आहेत. भाजीपाला सध्या स्वस्त आहे. येत्या काही दिवसांत त्याच्याही किमती गरिबांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील हजारो कुटुंबे हातावर आणून पानावर खाणारी आहेत. अशा कुटुंबांना या महागाईची सर्वाधिक झळ बसणार आहे. नोकरदार वर्ग हा खर्च पेलू शकेल. पण गरिबांचे काही खरे नाही, या दिशेने बाजाराची वाटचाल सुरू असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
डिझेल शंभरीपार
- डिझेलच्या दरात वाढ झाल्याने चंद्रपूरच्या बाजारावरही परिणाम जाणवू लागला. सध्या प्रति लिटर ९९.१३ पैसे असा दर आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा वाढण्याची भीती आहे.
मालवाहतूक टक्क्यांनी वाढली
- पेट्रोल व डिझेलचे दर वाढले की वाहतुकीचे दर चढे होतात. दिवाळीच्या तोंडावर व्यापारी मालाचा साठा करीत आहेत. मालवाहतुकीचे दर २१ टक्क्यांनी वाढल्याने येत्या काही दिवसांत त्याचा वस्तूंच्या किमतीवर परिणाम जाणवणार आहे.
किराणा महागणार
चंद्रपूर जिल्ह्यात आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, नागपूर तसेच पंजाबमधून धान्याची आवक होते. साखर, तेल, विविध प्रकारच्या डाळी इटारसी, बैतूल, हैदराबाद येथूनही आणल्या जातात. परराज्यातून मालवाहतूक करण्याचे दर वाढले. यामुळे जीवनाश्यक वस्तूंच्या किमती भडकू शकतात.