गारांमुळे शेकडो मासोळ्या मृत्यूमुखी

By admin | Published: March 10, 2017 01:49 AM2017-03-10T01:49:28+5:302017-03-10T01:49:28+5:30

जिल्ह्याच्या विविध भागात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका शेतकऱ्यांसह पशु-पक्षांनाही बसला आहे.

Hundreds of fish died due to the hail | गारांमुळे शेकडो मासोळ्या मृत्यूमुखी

गारांमुळे शेकडो मासोळ्या मृत्यूमुखी

Next

पालकमंत्र्यांचे पंचनामे करण्याचे निर्देश : बल्लारपूर तालुक्यात पिकांचे ५० टक्के नुकसान
चंद्रपूर : जिल्ह्याच्या विविध भागात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका शेतकऱ्यांसह पशु-पक्षांनाही बसला आहे. अनेक गावात गारांचा खच पडला. परंतु या गारांमुळे पाण्याचे तापमान खाली येऊन राजुरा तालुक्यातील रामपूर येथील एका शेततलावातील शेकडो मासोळ्या मृत्यूमुखी पडल्या. बल्ल्लारपूर तालुक्यात रबी हंगामातील पिकांचे ५० टक्के नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
राजुरा तालुक्यातील सास्ती येथून दोन किलोमीटर अंतरावर रामनगर आहे. तेथे राजकुमार निषद यांनी वर्धा नदीलगत शेत आहे. या शेतात जोडधंदा म्हणून राजकुमार निषद यांनी शेततळे तयार करून मत्स्यपालन व्यवसाय करतात. निषद यांचे कुटुंब मोठे असल्याने त्यांनी हा जोडधंदा सुरू केला आहे. परंतु मंगळवारची गारपीट त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरली. या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन शेतात बर्फाळ परिस्थिती निर्माण झाली. रामनगर येथील अनेक शेतातील पिके गारांच्या आच्छादनाखाली झाकली गेली. त्या गारा शेततळ्यातही पडल्या होत्या.
रामपूर येथील वार्ताहराने दुसऱ्या ुदिवशी या गावाला भेट दिली. त्यावेळी निषद यांना सकाळी शेततळ्यातील अनेक मासोळ्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. गारपिटीमुळे या शेततळ्यातील पाणी थंड झाले होते. पाण्याचे तापमान खुप खाली गेले होते. परिणामी पाण्यातील मासोळ्यात ते तापमान सहन करू शकल्या नाही. चार-पाच किलो वजनाच्या मासोळ्या आणि त्यांची पिलेदेखील मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले. यामध्ये त्यांचे दीड-दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात बँकांकडून कर्ज घेऊन पेरणी केली होती. रबीतही तीच परिस्थिती आहे. या कर्जाची परतफेड ३१ मार्चपर्यंत करण्याचे नियोजन केलेल्या शेतकऱ्यांना गारपीट व अवकाळी पावसाने दगा दिला आहे. तूर, लाखोळी, बरबटी, हरभरा आदी पूर्ण जमा होईपर्यनत मळणीयंत्र लावले जात नाही. हे उत्पादन जमा करून ठेवण्यात येते.
आता ते जमा असलेले पीक अवकाळी पावसात सापडले. त्यामुळे ते ओले होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

बल्लारपुरात घरांची पडझड, म्हशीचा मृत्यू
बल्लारपूर : तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे सरासरी ५० टक्के नुकसान झाले आहे. बल्लारपूर, विसापूर, भिवकुंड, कोठारी, काटवली कवडजई आदी भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. बल्लारपूर परिसरात २९७ एकरातील रबी हंगामातील २०५ एकरामधील पिकांना फटका बसला आहे. कोठारी क्षेत्रात ३९१ एकरपैकी ११९ एकर क्षेत्र बाधित झाले आहे. नांदगाव पोडे, हडस्ती, माना या भागातील २३४ एकरपैकी ११७ एकर क्षेत्रातील पिके प्रभावित झाली आहेत. कळमना परिसरात ७६७ एकरापैकी २२४ एकर, पळसगाव परिसरात २९६ एकरपैकी ८२ एकर आदी क्षेत्रात नुकसान झाले आहे. गारांच्या मारामुळे बामणी येथील संजय कुहिटे यांची शेतात बांधून असलेली म्हैस मरण पावली. दहेली येथील दोन झोपड्यांचे छप्पर उडाले. तर बल्लारपूर येथेही घरांची पडझड झाली. या नुकसानीची माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालयाने सर्वेक्षण पथक तयार करून माहिती गोळा करणे सुरू केले आहे. सहायक जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसीलदार विकास अहीर, मंडळ अधिकारी विजय बोरीकर यांनी बुधवारी अवकाळी पाऊस बाधित भागातील नुकसानीची पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)

सर्वेक्षण करण्याचे निर्देश
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी बल्लारपूर, राजुरा आणि चिमूर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यात घरांची पडझड होऊन जनावरांचाही मृत्यू झाला आहे. कोठारी परिसरात जनावरांचे मोठे नुकसान झाले. रामनगर येथे शेततळ्यातील मासोळ्या मरण पावल्या आहेत. अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील पीक बाधित झाले आहे.

Web Title: Hundreds of fish died due to the hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.