शेकडो गुरुजींनी ठोकला मुख्यालयाला रामराम
By admin | Published: July 15, 2016 01:11 AM2016-07-15T01:11:20+5:302016-07-15T01:11:20+5:30
राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक समाजाच्या मुलांना समान व दर्जेदार शिक्षण मिळावे, कुणीही यापासून वंचित राहू नये.
शासन नियमाची पायमल्ली : शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार
जिवती : राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक समाजाच्या मुलांना समान व दर्जेदार शिक्षण मिळावे, कुणीही यापासून वंचित राहू नये. यासाठी शिक्षण विभागाकडून विविध क्षेत्राच्या माध्यमातून जनजागृती होताना दिसते. तर दुसरीकडे मात्र पहाडावर दर्जेदार शिक्षणाची सोय नसल्याच्या कारणावरुन जिवतीत व परिसरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारीसह शेकडोच्यावर गुरुजींनी मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला रामराम ठोकत शहर गाठल्याचा प्रकार सध्या दिसून येत आहे.
जिवती तालुका हा अतिदुर्गम आणि मागासलेला तालुका म्हणून सर्वत्र परिचित आहे. परिसरात राहणाऱ्या संपूर्ण नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने सगळ्यांचीच आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याची गरज आहे. आई- वडीलही अज्ञानी असल्याने घरी त्यांना कोणीही शिक्षणाविषयी माहिती देत नाही. आजपर्यंत शिक्षकांनीच आपली भूमिका चांगली निभावली. अजूनही निभावतील अशी आशा आहे. पण दिवसेंदिवस तालुक्याची स्थिती खराब होताना दिसत आहे.
बाजारपेठ मंदावत आहे. दिवसभर वाटणारी वर्दळ कुठे तरी नाहिसी होताना दिसत आहे. चार चौघात शिक्षणाचे गप्पा ठोकणारा गुरुजी आता अपडाऊनच्या प्रवाशाला लागल्याने पहाडावरील शैक्षणिक क्षेत्रातील कार्य आता ढासळत चालल्याचे दिसून येत आहे. शालेय मिटींग, डाक पोहचविणे इत्यादी कामाचे बहाणे करीत शिक्षकही शाळेत उशिरा जाणे, मोजकच शिकविणे, आणि वेळेच्या आता शाळा बंद करुन परतीच्या मार्गाला लागणे, अशा प्रकारामुळे पहाडावरच्या गुरुजीवरचा विश्वास कमी होवू लागल आहे.
स्वत:च्या मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडणाऱ्या गुरुजींनी आमच्या मुलांना कुठला शिक्षण देतात? खरच आमच्या मुलांच्या दर्जेदार शिक्षण मिळतोय काय? अपडाऊनच्या प्रवासातून खरच गुरुजी मन लावून शाळेत शिकवित असेल काय? यावर शिक्षण विभागाने चिंतन करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)