केरकचरा दहनासाठी शेकडो हात सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:10 PM2018-03-03T23:10:59+5:302018-03-03T23:10:59+5:30
स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी भद्रावतीकरांनी होळीच्या दिवशी शहरात स्वच्छता मोहीम राबवून कचरा संकलित केला. दरम्यान नागमंदिर परिसरात केरकचऱ्यासह वाईट विचारांची ग्रामशुद्ध होळी करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
भद्रावती : स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी भद्रावतीकरांनी होळीच्या दिवशी शहरात स्वच्छता मोहीम राबवून कचरा संकलित केला. दरम्यान नागमंदिर परिसरात केरकचऱ्यासह वाईट विचारांची ग्रामशुद्ध होळी करण्यात आली.
स्थानिक विवेकानंद महाविद्यालय भद्रावती अंतर्गत माजी विद्यार्थी संघ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, युगपुरूष स्वामी विवेकानंद विद्यार्थी बहुउद्देशीय संस्था, स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक-मित्र मंडळ व नगर परिषद भद्रावतीच्या संयुक्त विद्यमाने भद्रावती शहरात शुक्रवारी गावातील विविध संस्था व मंडळे तसेच जेष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, नगर परिषदेचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्राचार्य, ग्राहक पंचायत भद्रावतीचे पदाधिकारी, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनी हातात झाडू घेवून ढोल ताशाच्या गजरात, भजन दींडीसह नगर परिषद भद्रावतीच्या कामगारांसोबत मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजंूचा केरकचरा गोळा करण्यात आला. या मिरवणुकीत बाबाराव तेलबांधे यांनी कर्मयोगी गाडगे महाराजांची वेशभूषा परिधान केली होती. तर महाविद्यालयाच्या पर्यावरण अभ्यास मंडळाअंतर्गत विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा, पाण्याचा अपव्यय थांबवा, उघड्यावर शौचास बसू नका, शौचालयाचा वापर करा, कचरा कुंड्याचा वापर करा, स्वच्छतेची कास धरा, प्लॅस्टिक टाळा प्लॅनियो (कामडी पिशव्या) वापरा अशा घोषणा मिरवणुकीत देण्यात येत होत्या.
उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, म्हणून माजी विद्यार्थी संघ विवेकानंद महाविद्यालयातर्फे विविध ठिकाणी पक्षी घागर बांधण्यात आल्या. सदर मिरवणूक नागमंदिर परिसरात पोहचल्यानंतर गोळा केलेल्या केरकचऱ्याची होळी करुन आ. बाळू धानोरकर व प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून होळीचे दहन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप हुतात्मा स्मारकासमोर करण्यात आला. उद्घाटन आ. धानोरकर तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जगन्नाथ गावंडे, उपाध्यक्ष प्रफुल ग्रामशुद्धी होळीचे समन्वयक, प्रा. जयवंत काकडे, प्रवीण महाजन, सुनिता खंडाळकर, पुरुषोत्तमराव मत्ते, नायब तहसीलदार काळे उपस्थित होते