शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:54 PM2018-08-17T22:54:44+5:302018-08-17T22:55:51+5:30

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडल्याने शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आली आहे. पुरामुळे कापूस व सोयाबीन पिकावर अनिष्ठ परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी कोरपना तालुक्यातील अंतरगावला पुराने वेढा घातला. तर वर्धा नदीला पूर आल्याने दुपारी २ वाजताच्या सुमारास बल्लारपूर-राजुरा हा मार्ग बंद करण्यात आला.

Hundreds of hectares of agricultural land | शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली

शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली

googlenewsNext
ठळक मुद्देवर्धा नदीला पूर : वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह आढळला, बल्लारपूर-राजुरा मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडल्याने शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आली आहे. पुरामुळे कापूस व सोयाबीन पिकावर अनिष्ठ परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी कोरपना तालुक्यातील अंतरगावला पुराने वेढा घातला. तर वर्धा नदीला पूर आल्याने दुपारी २ वाजताच्या सुमारास बल्लारपूर-राजुरा हा मार्ग बंद करण्यात आला. शुक्रवारी दिवसभर रिपरिप सुरूच होती. सावली तालुक्यातील भान्सी येथील यशवंत कुमरे (५५) हा शेतकरी गुरुवारी सायंकाळी बैल धुताना नाल्याच्या पुरात वाहून गेला होता. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळला.
वर्धा नदीतील पुराचे पाणी बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, आमडी, कळमना, बामणी, कुडेसावली, परसोडी, पाचगाव, तोहोगाव, वेजगाव, लाठी या गावांच्या शेतात शिरले. परिणामी शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली आले आहे. कन्हाळगाव, चनई, धानोली, परसोडा, कारगाव, मांडवा, येरगव्हान, पिपरी, माथा, शेरज, हेटी व कोडसी येथील शेती पुराच्या पाण्यात बुडाली आहे. दोन दिवसांपासून परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने कोरपना तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंतरगावाला पुराने वेढा घातला असून सर्वच मार्ग बंद झालेत. कन्हाळगाव, चनई, धानोली, परसोडा, कारगाव, मांडवा, येरगव्हान, पिपरी, माथा, शेरज, हेटी, कोडसी गावालगतच्या शिवारातील पिके पूर्णत: बुडली आहेत. नाल्याचे पाणी अंतररगाव, नांदा, राजुरगुडा, सांगोडा येथ शिरल्याने शेती जलमय झाली आहे.
अंतरगाव येथे जाण्याचा रस्ता बंद झाला. शिवाय कोरपना-अंतररगाव-भोयगाव, राजुरगुडा, वलालगुडा मार्गही बंद झाला आहे. गुरुवारी पहाटे बंद झालेले राजूरा-आदिलाबाद, परसोडा, कन्हाळगाव, मांडवा, जिवती मार्ग आज दुपारी सुरू झाला आहे. आसन येथील जिल्हा परिषद शाळेत शिरलेले पाणी ओसरले आहे. दरम्यान शुक्रवारी दिवसभर या परिसरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शेतीचे साहित्य वाहून गेले. पुरामुळे वैनगंगा आणि वर्धा नदीच्या जलस्तरात मोठी वाढ झाली आहे. उमानदीला पूर आल्याने सिंदेवाही तालुक्यातील कळमना, विसापूर, कुकडहेटी, मोहाडी, नलेश्वर, चारगाव, बामणी, गोंड मोहाडी, पांगळी, विसापूर या गावांचा गुरूवारी तालुक्याशी संपर्क काही काळाकरिता तुटला होता.
कापूस, सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान
कोठारी : आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने कोठारी परिसरातील नाल्याला पूर आला. दोन दिवसांपासून हजारोे हेक्टरवरील पीक पूराच्या पाण्याखाली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. कोठारी, पळसगाव , आमडी, कळमना, काटवली, बामणी, कुडेसावली, परसोडी, पाचगाव, तोहोगाव, वेजगाव, लाठी येथील पिकांना मोठा फ टका बसला. मागील पंधरा दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. पाऊस आला नसता तर पिकांचे नुकसान होईल, अशी धास्ती होती. दरम्यान पावसाचे पुनरागमन आता शाप ठरल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. वर्धा नदीचे पाणी उलट प्रवाहाने नाल्याद्वारे शेतात शिरत आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला. पुराच्या पाण्यामुळे उत्पादन घटणार असून शेतकरी हतबल झाले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतल्या जाते. भाजीपाला शेतीत पूराचे पाणी गेले. त्यामुळे भाजीपाल्याची शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आली आहे.
पुलाअभावी ‘त्या’ दहा गावांचे हाल
वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील उमा नदी पुलावरुन गुरूवारी पाणी वाहत असल्याने तब्बल १२ तास वाहतूक बंद होती. परिसरातील १० गावांचा संपर्क सिंदेवाही शहराचा संपर्क तुटला होता. पुरामुळे उमा नदीवरील कळमगाव (गन्ना) गावाजवळील पुलावरुन पाणी वाहू लागले. कळमगाव, नलेश्वर, मोहाडी, कुकडहेटी, विसापूर, चारगाव, बाम्हणी, मोहबोडी, इटोली या गावातील लोकांना सदर पुलावरुन ये-जा करावी लागते. गुरूवारी सदर गावातील नागरिक सिंदेवाही शहरात जावू शकले नाहीत. या नदीवरील पूल कमी उंचीचा असल्याने नागरिकांना दरवर्षी त्रास होतो. परिसरातील शेतकऱ्यांनी यासंदर्भात तक्रार वारंवार प्रशासनाकडे निवेदन दिले. परंतु या समस्येकडे लक्ष दिले नाही. कळमगाव, विसापूर, कुकडहेटी, मोहाडी, नलेश्वर आदी दहा गावांतील नागरिकांना पाणी पुलावरून असल्यास वासेरामार्गे २५ किमी अंतराचा प्रवास करावा लागतो. गुरुवारी पुलावरुन पाणी असल्याने परिसरातील जनजीवन विस्कडीत झाले होते. शाळा बसेस बंद होत्या. तर शाळेत मुले जावू शकले नाही. सिंदेवाही-कळमगाव रस्त्यावरील उमा नदीवरील पुल मोठा तयार करण्याची मागणी कळमगाव परिसरातील जनतेकडून करण्यात येत आहे.
धानोरा- गडचांदूर मार्ग बंद
घुग्घुस : तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसामुळे वर्धा पैनगंगा नदी दुथडी वाहत आहे. गुरूवारी सकाळपासून वर्धा नदीवरील धानोरा पुलावरून पाणी वाहत असल्याने गडचांदूर मार्ग बंद झाला आहे. पावसामुळे वेकोलि प्रशासनाने खुल्या खाणीतील खनन बंद केले. धानोरा येथील पावसामुळे एक घर कोसळल्याची घटना घडली.
तोहोगाव परिसरातील दहा गावे प्रभावित
तोहोगाव : कोठारी- तोहोगाव- लाठी या मार्गावरील दहा गावे बाधित झाली आहे. शेकडो हेक्टरवरील सोयाबिन, कापूस बियाणाचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबिन पीक फुलोºयावर असून पुरामुळे सोयाबिन सडून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऐन तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास या पुराने हिरावला आहे. पदराचे पैसे खर्च करुन सोयाबिन, कापूस, धान पीक शेतात लावले. त्याला खत पाणी घातले व निंदण फवारणी करुन हातचे पैसे पिकावर खर्च केले. परंतु तेच पीक पुरामुळे वाहून जाणार असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

Web Title: Hundreds of hectares of agricultural land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.