तेंदूपत्ता लिलावाअभावी शेकडो मजुरांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:24 PM2018-05-07T23:24:39+5:302018-05-07T23:24:39+5:30
कोठारी वनपरिक्षेत्रातील तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी कंत्राटदारांनी लिलावाकडे पाठ फिरविली. त्यामुळे आठ गावात रोजागराची समस्या निर्माण होवून गोरगरीब मजुरांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : कोठारी वनपरिक्षेत्रातील तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी कंत्राटदारांनी लिलावाकडे पाठ फिरविली. त्यामुळे आठ गावात रोजागराची समस्या निर्माण होवून गोरगरीब मजुरांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरवर्षी प्रमाणे तेंदूपत्ता हंगाम सुरु होणार, या आशेने कोठारी परिसरातील गोरगरीब जनता वाट पाहात होती. कोठारी वन परिक्षेत्रात येणाऱ्या युनिट शेजारी आक्सापूर केमारा, तोहोगाव आणि बल्लारपूर युनिटमध्ये तेंदूपाने संकलन केंद्र सुरु झाले. मात्र, कोठारी आणि परिसरातील आठ गावांत तेंदुपत्ता संकलनाचे काम सुरू झाले नाही. यावर्षी कोठारी युनिट लिलावात खरेदी करण्याच्या निविदा कंत्राटदारांनी भरल्या. परंतु, मात्र युनिटची किंमत अल्प असल्याने शासनाने निविदा मंजूर केली नाही, अशी माहिती पुढे आली. रोजगार देणारा हा हंगाम सुरूच न झाल्याने यावर्षी शेकडो मजुरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
तेंदूपत्ता संकलन हंगाम १५ दिवसांचा असतो. सर्वसामान्य जनतेला आधार देणारा हा हंगाम रोजगार केव्हा सुरू होणार, असा प्रश्न विचारत आहेत. कंत्राटदारांनी लिलावाकडे पाठ फिरविल्याने जनतेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शेतीचा हंगाम पूर्ण करण्यासाठी यातून अनेक आर्थिक लाभ मिळत होता. पण, हाताला कामच नसल्याने अल्पभूधारक शेतकºयांनी चिंता व्यक्त केली. तेंदूपत्ता संकलन सुरू केल्याने मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. या परिसरातील शेतीची कामे थंडबस्त्यात आहेत. रोजगाराची दुसरी साधने नाहीत. रोजगाराची समस्या लक्षात घेऊन वन विभागाने कोठारी युनिटमधील आठही गावांत संकलन सुरू करावी, अशी मागणी आहे.
वन विभागाने तोडगा काढावा
तेंदुपत्ता संकलन केंद्र सुरू न झाल्याने कोठारी वन परिक्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला सध्या कोणतीही कामे नाहीत. या परिसरातील जनता प्रामुख्याने नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून आहे. पारंपरिक शेती करणाºयांचे प्रमाण अधिक असल्याने आर्थिक परिस्थिती अजुनही बदलली नाही. त्यामुळे हंगामी रोजगाराकडे हजारो मजूर आशावादी नजरेने बघतात. परंतु, हक्काचा रोजगार देणारा तेंदुपत्ता हंगाम अद्याप सुरू करण्यात आला नाही. वन विभागाने या समस्येवर तातडीने तोडगा काढावी, अशी केली जात आहे.