गरिबांचे शेकडो टन धान्य पावसात भिजले
By admin | Published: June 19, 2014 12:00 AM2014-06-19T00:00:38+5:302014-06-19T00:00:38+5:30
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे काल मंगळवारपासून येथील रेल्वे रॅक पार्इंटवर पावसात भिजून ओलेचिंब झाले आहेत.
जमिनीवर उतरविले धान्य: कंत्राटी कंपनीचा संतापजनक प्रताप
चंद्रपूर: सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे काल मंगळवारपासून येथील रेल्वे रॅक पार्इंटवर पावसात भिजून ओलेचिंब झाले आहेत. काही धान्य तर चिखलात मिसळून खराब झाले. हा प्रकार आज बुधवारी सकाळी उजेडात आला. या संतापजनक प्रकाराला वखार महामंडळ व संबंधित कंत्राटदारच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून जिल्हाभर स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर हे धान्य वाटप केले जाते. विविध राज्यातून हे धान्य रेल्वेच्या माध्यमातून आणले जातात. रेल्वे रॅक पार्इंटवर हा माल उतरवून तो तात्काळ ट्रकमध्ये लोड केला जातो व ट्रकद्वारे पडोली येथील शासकीय गोदामात साठविला जातो. यासाठी प्रशासनाकडून कंत्राट दिले जाते. मात्र कंत्राटदारांकडे धान्य नेण्यासाठी ट्रकसारखे मोठे वाहन असणे बंधनकारक असते. रेल्वे रॅक पार्इंटवरून धान्य लोड करण्याचे कंत्राट सध्या एस.के. ट्रान्सलाईन या जळगाव येथील कंपनीला दिले आहे. या कंपनीने जळगाव येथील ट्रकचे क्रमांक देऊन हे कंत्राट मिळवून घेतले. वास्तविक या कंपनीकडे ट्रक फारच कमी असल्याची माहिती आहे.
काल मंगळवारी मध्यप्रदेशातून सुमारे ९०० टन गहू रेल्वेने येथील रेल्वे रॅक पार्इंटवर आणण्यात आला. रेल्वेने हे धान्य आल्यानंतर नऊ तासात ते ट्रकमध्ये लोड करावे लागतात. मात्र संबंधित कंत्राटदारांनी हा ९०० टन गहू काल येथील रेल्वे पार्इंटवर जमिनीवरच उतरविला. वास्तविक काल सकाळपासूनच पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला जात होता. शिवाय पावसाळ्याचेही दिवस सुरू आहेत. असे असतानाही एस.के. ट्रान्सलाईन या कंत्राटी कंपनीने हा माल जमिनीवर डॅम्प केला. अपेक्षेप्रमाणे काल सायंकाळी दमदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे ९०० टनपैकी शेकडो टन धान्य या पावसात भिजत राहिले. वास्तविक या रेल्वे रॅक पार्इंटवर धान्य येणे, हे धान्य सुखरुप शासकीय गोदाम पोहचविणे, ही जबाबदारी वखार महामंडळाची असते. याचे कंत्राट दिले असले तरी त्यावर देखरख वखार महामंडळच ठेवते. पावसाचा अंदाज असताना वखार महामंडळाने एवढे मोठे धान्य जमिनीवर उतरविण्याची परवानगी कशी काय दिली, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पार्इंटवरील याच जमिनीवर रासायनिक खते उतरविली होती. तिथेच गहू उतरविला. जिथे गहू पडून होता तिथे पाणी साचून होते. हाच गहू बाहेर काढून वाळवून पुन्हा तो गरिबांच्या माथी मारला जाणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)