सर्व्हर डाऊनमुळे विविध भागातील शेकडो विद्यार्थी परीक्षेला मुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:31 PM2018-05-22T23:31:15+5:302018-05-22T23:31:32+5:30
राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालयाकडून अभियंता पदासाठी मंगळवारी परीक्षा घेण्यात आली. मात्र चंद्रपूर शहरातील काही परीक्षा केंद्रावरील सर्व्हर डाऊनमुळे शेकडो परीक्षार्थींना फटका बसला. अनेकांना परीक्षा देता न आल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांनी परीक्षा केंद्र गाठून समजूत काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालयाकडून अभियंता पदासाठी मंगळवारी परीक्षा घेण्यात आली. मात्र चंद्रपूर शहरातील काही परीक्षा केंद्रावरील सर्व्हर डाऊनमुळे शेकडो परीक्षार्थींना फटका बसला. अनेकांना परीक्षा देता न आल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांनी परीक्षा केंद्र गाठून समजूत काढली.
राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालयाने महाराष्ट्र नगर परिषद सेवा अंतर्गत श्रेणी अ, ब, क व ड च्या संवर्गातील स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, संगणक अभियांत्रिकी सेवा, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा, लेखा परीक्षण लेखा सेवा, कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या सारख्या पदासाठी परीक्षेचे आयोजन केले होते. यात चंद्रपूर शहरातील गुरुसाई अभियांत्रिकी महाविद्यालय व रेनायसन्स अभियांत्रिकी महाविद्यालय, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या तीन ठिकाणी आॅनलाईन परीक्षेचे केंद्र देण्यात आले.
मात्र गुरुसाई अभियांत्रिकी महाविद्यालय येथील केंद्रावर परीक्षेचा सर्व्हर फेल असल्याने या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या तब्बल एक हजार विध्यार्थ्यांना फटका बसला. त्याच वेळेस मात्र रेनायसन्स महाविद्यालय व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे परीक्षा सुरळीत सुरु होती. या संपूर्ण प्रकारामुळे गुरुसाई अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षार्थ्यांनी चांगलाच गोंधळ घातला. या प्रकारानंतर युवासेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
गेल्या ४ दिवसांपासून राज्य सरकारतर्फे महाआयटी संस्था ही परीक्षा घेत आहे. ही परीक्षा देण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपºयातून हजारो विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर आले होते. मात्र सर्व्हर डाऊनमुळे परीक्षार्थींमध्ये प्रचंड रोष बघायला मिळाला. ही परीक्षा सकाळी ९.३० ते ११, दुपारी १२.३० ते २ व २.३० ते ५ या वेळात होती. मात्र सकाळी पहिल्या बॅचपासूनच सर्व्हरमुळे गोंधळ सुरु झाला.