शेकडो विद्यार्थी उपोषणावर
By admin | Published: July 30, 2016 12:51 AM2016-07-30T00:51:36+5:302016-07-30T00:51:36+5:30
अकरावीच्या प्रवेशापासून वंचित असलेले शेकडो विद्यार्थी ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेचे स्वप्नील धुर्वे ...
वणी : अकरावीच्या प्रवेशापासून वंचित असलेले शेकडो विद्यार्थी ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेचे स्वप्नील धुर्वे यांच्या नेतृत्वात स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालयासमोर शुक्रवारपासून साखळी उपोषणाला बसले आहेत, तर स्वप्नील धुर्वे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार या आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे.
वणी उपविभागातील विद्यार्थ्यांना अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश मिळावा, यासाठी ५ जुलैै रोजी ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली १८३ विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मागेल त्या महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल व कुणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असा शब्द शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र २० दिवस लोटूनही वणी उपविभागातील १४० विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून अद्यापही वंचित आहेत. त्यांचे प्रवेश तातडीने करून देण्यात यावेत, यासाठी शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालयासमोर स्वप्नील धुर्वे यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला, तर त्यांच्या समवेत ७९ विद्यार्थीनी व ७१ विद्यार्थी अशा एकूण १४० विद्यार्थ्यांनी विज्ञान व वाणिज्य शाखेत प्रवेश मिळावा, यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
यावेळी ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेचे विकेश पानघाटे, प्रविण खानझोडे, अखील सातोकर, सिद्धीक रंगरेज, श्रीकांत ठाकरे, ज्ञानदीप निमसटकर, संदेश तिखट, वैभव डंभारे, प्रमोद एडलावार आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
विविध संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा
या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय किसान मजदूर संघ, स्वराज्य युवा संघटना, भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पार्टी, विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी बहुजन स्टुडंट फेडरेशन, ग्राहक संरक्षण संस्था, एफएएम, संत गाडगेबाबा युवा विचार मंच आदी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.